साईमत जळगाव प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडत विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले की, “चार-चार दिवस आम्हाला डोळ्याला डोळा लावता आला नाही, जेवणही नीट झालं नाही. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्याने थोडा तरी आराम मिळाला,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
संभाजीनगरमध्ये एमआयएमसोबत युती झाल्याच्या आरोपांवर बोलताना गिरीश महाजन यांनी हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. “आमची कुठेही एमआयएमसोबत युती झालेली नाही. कोणीही उठून काहीही बोलतं. जळगाव, नाशिक किंवा इतर ठिकाणी युती झाली, याला कोणताही ठोस आधार नाही. अशा वक्तव्यांना किती महत्त्व द्यायचं, हे जनतेनं ठरवावं,” असा टोला त्यांनी लगावला.
पुण्यातील अजित पवारांशी संबंधित जमिनीच्या प्रकरणावर बोलताना महाजन म्हणाले की, “या प्रकरणाची चौकशी सुरू असून स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली आहे. लवकरच सर्व सत्य समोर येईल. चौकशी सुरू असताना त्यावर भाष्य करणं योग्य नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर झालेल्या अश्लील व टोकाच्या पोस्ट्सवर संताप व्यक्त करताना महाजन म्हणाले, “कोणताही नेता असो, अशा अर्वाच्य भाषेचा वापर करणं योग्य नाही. सोशल मीडियावर अशा पोस्ट्स टाकणाऱ्यांवर कारवाई झाली आहे आणि पुढेही होईल.”
मुंबई महापौरपदावरून ठाकरे बंधूंवर निशाणा साधताना त्यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही कधीच बाहेरचा महापौर होईल असं म्हटलं नाही. मराठी माणूसच महापौर होणार आहे. मात्र लोकांना फक्त भावनिक मुद्द्यांवर फार काळ उल्लू बनवता येत नाही. मुंबईला विकास हवा आहे. ठाकरे बंधूंकडे मुंबईखेरीज दुसरा कोणताही मुद्दा नाही. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईचं चित्र बदललं आहे.”
महापालिका निवडणुकांबाबत बोलताना महाजन म्हणाले की, “महायुतीची तयारी जोरात सुरू आहे. काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढत आहोत. कार्यकर्ते आणि उमेदवार पूर्णपणे तयार आहेत. १६ तारखेला लागणारा निकाल अनेकांसाठी आश्चर्यकारक असेल. तब्बल ८० ते ८५ टक्के महापालिका महायुतीकडे येतील,” असा ठाम दावा त्यांनी केला.
मुंबई महापालिकेबाबत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. “यावेळी शिवसेनेचा उघडा जुगार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईतून पूर्णपणे साफ होईल. राज ठाकरे यांच्या सभा लोक करमणुकीसाठी ऐकतात, मात्र त्याचं मतांमध्ये रूपांतर होत नाही. निवडणुका आल्या की मराठी माणूस आणि मुंबई गुजरातला जाणार हेच दोन मुद्दे मांडले जातात. यापलीकडे त्यांच्याकडे काहीच नाही,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
नाशिकमधील वृक्षतोडीवर ‘लाकूडतोड्या’ अशी उपमा दिल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर पलटवार करताना महाजन म्हणाले, “नाशिकमध्ये कुंभमेळा आहे, साधुसंतांची परंपरा आहे. जुनी झाडं आम्ही काढत नाही. गेल्या दहा-बारा वर्षांत उगवलेली झाडं नियमानुसार काढली जात आहेत. माहिती न घेता बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे. उलट मी नाशिकमध्ये जवळपास २० हजार झाडं लावत आहे.”
अजित पवारांच्या पुण्यातील सभेवर बोलताना त्यांनी सांगितले की, “अजितदादांशी आमची लढत मैत्रीपूर्ण आहे. मतदारच ठरवतील कोण योग्य आहे. आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही, ही आमची भूमिका आहे. काही ठिकाणी वक्तव्यं झाली असतील तर त्याला उत्तर दिलं जाईल.”
एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले, “आता सगळं उघड होत चाललं आहे. कोण कुठल्या धंद्यात आहे, जमीन घोटाळा, आयटी, मुरूम – सगळं जनतेला माहिती आहे.”
एकूणच गिरीश महाजन यांच्या या सडेतोड विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापलं असून, येत्या १६ तारखेला लागणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
