Marathi School In Gondkhel : गोंडखेलला मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांना ‘घरपट्टी’ केली माफ

0
29

जामनेर तालुक्यातील गोंडखेल ग्रा.पं.चा आदर्श उपक्रम

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी गोंडखेल ग्रामपंचायतीने आदर्श उपक्रम राबवित पहिलीत प्रवेश घेतलेल्या पाल्यांच्या पालकांना वर्षभरासाठी घरपट्टीसह पाणीपट्टी कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गावातील मराठी शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याचे आश्वासन जामनेर तालुक्यातील गोंडखेलचे सरपंच विठ्ठल सोन्ने यांनी दिले.

गोंडखेल येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत गोंडखेलतर्फे दप्तर व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी सरपंच विठ्ठल सोन्ने यांनी वरील निर्णय घोषित केला. तसेच शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. भविष्यात शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद मराठी शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील सुनील मगर होते.यावेळी उपसरपंच गणेश वाघ, राजू राजपूत, प्रभू राजपूत, निलेश राजपूत, राजू दुडे, हरिभाऊ इंगळे, ग्रामपंचायत सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आरती कोळी यांच्यासह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार

यावेळी गावातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिकेचीही निर्मिती ग्रामपंचायततर्फे करण्यात आली. अभ्यासिकेसाठीही ग्रा.पं.च्यावतीने आवश्यक ग्रंथ व इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या. याकामी ग्रामविस्तार अधिकारी श्रीमती वराडे यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेश पाटील, अशोक कोळी, आकोश कोळी, राजाराम कोळी, नामदेव पाटोळे, प्रमोद पाटील, श्री.हणमंते आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here