साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील धुळे रस्त्यावरील पुन्शी पेट्रोल पंपाजवळ सर्व एसटी बसेस यांना थांबा देण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन गेल्या १९ जुलै रोजी चाळीसगाव शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यामार्फत आगार प्रमुखांना देण्यात आले होते. त्याची दखल चाळीसगाव बस आगार प्रमुखांनी घेऊन ८ ऑगस्टपासून धुळे रोड पुन्शी पेट्रोल पंप येथे एसटी बसला थांबा देऊन शिवसेनेची मागणी मान्य केली. याठिकाणी एसटी बस थांबल्यावर परिसरातील नागरिक, महिलांनी बसचे स्वागत करून चालकाचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.
चाळीसगाव बस स्थानक ते धुळे जाणाऱ्या व धुळ्याहून चाळीसगाव येणाऱ्या सर्व बसेसला पुन्शी पेट्रोल पंपाजवळ बस थांबा देण्यात यावा. आजपर्यंत या ठिकाणाहून असंख्य महिला आणि पुरुष बाहेरगावी कामानिमित्त दररोज जात असतात. रात्री-बेरात्री अनेक पुरुषांसह महिलांचे हाल होत असतात. त्याची दखल घेऊन शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख यांनी सविता कुमावत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले होते.
नागरिकांनी मानले आभार
यावेळी शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सविता कुमावत, मिनोती जगताप, छाया पाटील, अनिता पवार, स्वाती पुजारी, पूजा थोरात, रंजना महाजन, कल्पना निकम, ललिता वाघ, मोनाली महाजन, मीनाक्षी अहिरे, दीपाली अहिरे, वर्षा पाटील, रूपाली बोंबिटकर, शोभा महाले, मंगल राजपूत, लता मगर, संगीता जाधव, रमेश शिंदे, सुभाष गडक, बापू माळी, राजमल चव्हाण, मिस्त्री काका, महाजन काका आदी उपस्थित होते. बस थांबा सुरु झाल्याबद्दल धुळे रोड परिसरातील नागरिकांनी सविता कुमावत यांचे आभार मानले.