साईमत अमळनेर प्रतिनिधी
फेब्रुवारी महिन्यात अमळनेर तालुक्यातील एका गावातील १८ वर्षाचा तरुण पुण्यातील शिक्षणासाठी सुट्टी घेऊन आला होता. त्याला २७ फेब्रुवारी रोजी घश्यात खवखव सुरू झाल्यानंतर त्याने स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. मात्र, त्याला बरे वाटत नव्हते आणि त्याच्या पायाला अशक्तपणा जाणवू लागला. या लक्षणांमुळे त्याला डॉ. पंकज महाजन यांच्याकडे पाठवण्यात आले, जिथे त्याच्या लक्षणांची तपासणी करून त्याला जीबीएसची शक्यता वाटली.
त्यानंतर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्याशी चर्चा करून त्या रुग्णाला जळगाव जिल्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. जळगावला त्याच्यावर प्लाझ्मा फेरीस पद्धतीने उपचार सुरू आहेत. जीबीएस संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.