जिल्ह्यातील केटरिंग व्यावसायिकांनी जिल्हाधिकारींकडे निवेदन सादर केले
साईमत / जळगाव / प्रतिनिधी –
ऐन लग्नसराईच्या मुहूर्त काळात जळगाव जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने केटरिंग व्यवसाय गंभीर संकटात आहे. शहरातील १०० हून अधिक कॅटरिंग व्यावसायिकांनी याबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदन देऊन व्यवसायिक सिलेंडर पुरवठा नियमित करण्याची मागणी केली आहे.
लग्नाची ऑर्डर रद्द, आर्थिक फटका
केटरिंग व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांचा रोजगार धोक्यात आला आहे. रतन सारस्वत, अध्यक्ष, खान्देश केटरिंग असोसिएशन यांच्या माहितीनुसार, अनेक लग्नांच्या ऑर्डर घेतल्या असून सिलेंडर न मिळाल्याने त्या रद्द कराव्या लागत आहेत, ज्यामुळे व्यवसायाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
रोजगार आणि गावाकडे जाण्याची वेळ
सिलेंडर तुटवड्यामुळे व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यावसायिकांना आहे. रोजगार उपलब्ध नसल्यामुळे काही केटरिंग व्यावसायिकांना गावाकडे परतण्याची वेळ आली आहे. “आणखी काही दिवस व्यवसायिक सिलेंडर मिळाले नाही, तर केटरिंग व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची वेळ येईल,” अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारींकडे मागणी
खान्देश केटरिंग असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सिलेंडरचा नियमित व सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी साकडे दिले आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.
