‘गणपती बाप्पा मोरया…’च्या जयघोषात ‘श्री’चे जल्लोषात आगमन

0
61

तरुणांसह चिमुकल्यांमध्ये पसरले होते उत्साहाचे वातावरण

साईमत/एरंडोल/प्रतिनिधी :

तालुक्यातील कासोदा येथे शनिवारी, ७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळांसह लहान-मोठ्या सुमारे ३० ते ३५ खासगी गणेश मंडळांनी सवाद्य मिरवणुका काढून ‘गणपती बाप्पा मोरया…’च्या जयघोषात ‘श्रीं’ची जल्लोषात स्थापना केली. तसेच शहरातील सार्वजनिक मंडळांनी मेनरोडपासून वाजतगाजत मिरवणुका काढून जल्लोषात गणेशमूर्तीची स्थापना केली. मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते ट्रॅक्टरवर ठेवलेल्या मूर्तीसमोर ढोलताशांच्या गजरात थिरकत होते. यावेळी गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला. शहरात सर्वत्र गल्लीबोळात तरुणांसह चिमुकल्यांमध्ये उत्साहाला उधाण आल्याचे वातावरण पसरले होतेे.

सार्वजनिक गणेश मंडळात जय शिवराय मित्र मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ, कासोदा कुस्तीगीर महासंघ (बजरंग गृप), जय सियाराम मित्र मंडळ, राम राज्य ग्रुप, संघर्ष ग्रुप, एकता मित्र मंडळ, वीर सावरकर मित्र मंडळ, समता गणेश मंडळ, शिवगर्जना मित्र मंडळासह आदी मंडळांनी गणेशोत्सवात सहभाग नोंदविला आहे. सात दिवसांचा गणेशोत्सव साजरा करून मनोरंजनाचे कार्यक्रम, जनजागृतीपर कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम, जातीय सलोखा, बंधुभाव वृद्धिंगत होणारे, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. मंडळे आपल्या गणेशमूर्ती सोबत आकर्षक आरास उभारून प्रमुख सामाजिक समस्यांवर प्रकाशझोत टाकला जातो.

पोलिसांनी ठेवला चोख बंदोबस्त

सात दिवसीय सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याची सत्तर वर्षांपेक्षा अधिक मोठी परंपरा कासोदा शहराला लाभली आहे. अशा संस्कृत ठेव्याचे जतन करण्यासाठी सर्व मंडळांचे कार्यकर्ते परिश्रम घेतात. कासोदा पो.स्टे.अंतर्गत होणाऱ्या गणेशोत्सव कार्यक्रमात स.पो.नि. निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दत्तू खुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांंनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here