रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील खोटे नगर थांब्याजवळील मानसेवा शाळेच्या पाठीमागील असणाऱ्या गुरुदत्त नगरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रुममध्ये अज्ञात चोरट्याने ९० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. त्यात एक लॅपटॉप आणि तीन मोबाईलचा समावेश आहे. चोरटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, शहरातील खोटे नगर थांब्याजवळील मानसेवा शाळेच्या पाठीमागील असणाऱ्या गुरुदत्त नगरात सविता दौड यांच्या मालकीचे घर आहे. त्यांनी आपला रुम एसएसबीटी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना भाड्याने दिला आहे. त्यापैकी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारे चिराग पाटील, गौरव कोळपे, ऋषीकेश इंगळे यांचे तीन मोबाईल आणि एक लॅपटॉप चोरट्याने घरात प्रवेश करुन लांबविला आहे. चोरट्याने घरावर पाळत ठेवून ही चोरी केल्याचा अंदाज विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद
याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक चोरटा कैद झाल्यामुळेे त्याचा पोलीस शोध घेत आहे.
