एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज-लहान मोठ्या घरफोडीच्या घटना घडत आहेत. अशात नातेवाईकांकडे लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी ३७ हजार रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. ही घटना ३१ मे ते ६ जून दरम्यान गायत्री नगरात घडली. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव शहरातील गायत्रीनगरातील ज्योती मेकलकर यांच्या नातेवाईकांकडे लग्न असल्याने त्या लग्न सोहळ्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधून घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून ९ हजार रुपये रोख, ६ हजार रुपये किमतीची सोन्याची बाळी, नथ, १० हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, चांदीचे नाणे, कुंकवाचे दोन करंडे, १२ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा ३७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. कुटुंबीय घरी आले. त्यावेळी ही घटना लक्षात आली.
कोऱ्या नोटांचे सहा बंडलही लांबविले
कपाटातील लक्ष्मी पूजनासाठी वापरण्यात येणाऱ्या कोऱ्या नोटांचे सहा बंडलही चोरट्यांनी लांबविले आहे. चोरीमध्ये पूजेच्या साहित्याचा अधिक समावेश असल्याचे सांगण्यात आले.