‘अंतर्नाद प्रतिष्ठान’तर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक अमितकुमार पाटील यांचे प्रतिपादन
साईमत/यावल /प्रतिनिधी :
सण-उत्सवांना केवळ पूजा-अर्चा आणि उत्सवापुरते मर्यादित न ठेवता त्याला सामाजिकतेची जोड दिली पाहिजे. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याची भावना यातून जपली गेली पाहिजे. अंतर्नाद प्रतिष्ठानचा ‘एक दुर्वा समर्पण’ हा उपक्रम त्यादृष्टीने प्रेरणादायी आहे. दात्यांच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. ही छोटीशी मदत विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवते आणि उद्या यांच्यातीलच कुणी समाजाला दिशा देणारा अधिकारी होईल, असे प्रतिपादन ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख तथा वाघळूद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अमितकुमार पाटील यांनी केले.
सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे “एक दुर्वा समर्पण” हा उपक्रम राबविण्यात आला. भुसावळ तालुक्यातील फेकरी जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात ५७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात बालमित्र पुस्तके, वह्या, पाटी, पेन्सिल, पेन आदी साहित्याचा समावेश होता. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच चेतना भिरूड, सामाजिक कार्यकर्ते संजय भिरूड, सुनील भिरूड, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रुकसानाबी फकीर, नसीरशहा फकीर, सलमानशहा फकीर, साबीरशा फकीर, मुख्याध्यापक चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षिका प्रियंका कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.पाच शाळांमध्ये दरवर्षी राबविला जातोय उपक्रम
गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून त्यातील बचतीतून उपक्रम राबविला जातो. दात्यांच्या स्वेच्छा योगदानातून उभारलेली मदत विद्यार्थ्यांना थेट पोहचविली जाते. गेल्या आठ वर्षांपासून दरवर्षी पाच शाळांमध्ये उपक्रम राबविला जात आहे. यंदा त्याचे नववे वर्ष आहे. यावेळी ग.स.सोसायटीचे सदस्य योगेश इंगळे, ज्ञानेश्वर घुले, कुंदन वायकोळे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील तसेच पालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी आयोजनात शाळा व्यवस्थापन समितीसह स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक अमितकुमार पाटील, सूत्रसंचालन कपिल धांडे तर आभार केतन महाजन यांनी मानले.