राज्यात गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त, दोन्ही सण धुमधडाक्यात साजरे होणार

0
20

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून लसीकरणही मोठ्या वेगाने सुरू आहे. त्यामुळेच आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व सण-उत्सवांवर निर्बंध होते. त्यामुळे इच्छा असतानाही हे उत्सव धुमधडाक्यात साजरे करता आले नाहीत. पण यंदाच्या वर्षी सर्व मंडळांचा उत्साह आणि गेल्या दोन वर्षी असलेल्या मर्यादा हे लक्षात घेऊन गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात साजरे व्हायला हवेत. याच संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली आणि कायदा-सुव्यवस्था राखून शांततेत हे उत्सव साजरे झाले पाहिजेत यासाठी सर्व पोलीस, जिल्हा प्रशासनांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.

गणेशोत्सव मंजळांना नोंदणी शुल्कात सूट

गणेशोत्सव आणि दहीहंडीसह इतर उत्सव सुरळीत पार पडायला हवेत यासाठी गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. यासोबतच मंंडपाची परवानगी प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी एक खिडकी योजनेद्वारे परवानग्या देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मंडपाच्या संदर्भात कुठलेही शुल्क न घेण्याचेही आम्ही सांगितले आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

गणेश मूर्तीवर कुठलीही मर्यादा नाही

मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं की, गणेश मूर्तीवर मर्यादा होती ती मर्यादा यंदाच्या वर्षी काढून टाकण्यात आली आहे.

दहीहंडी उत्सव साजरा करताना नियम पाळा

दहीहंडी उत्सव साजरा करताना सर्व नियम पाळले पाहिजेत. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या नियमांचं पालन व्हायला हवं.

 

युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहनांना टोलमाफी

मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या वेगाने रस्त्याचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णयही घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here