उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला मिळाली चालना
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
प्रबोधन संस्था व आपण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंमतगोष्टी’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त व आनंददायी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून त्यांचे नाव, शाळेचे नाव व आवडत्या गोष्टींची ओळख करून घेत संवादात्मक वातावरण निर्माण केले. त्यानंतर मुलांना ताजेतवाने व प्रसन्न करण्यासाठी ‘आ टमाटर’, ‘रम सम रम’ व ‘एक कच्चा घडा हूं मैं’ या गाण्यावर सामूहिक नृत्य करून घेण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांकडून काही निवडक गोष्टींचे वाचन करून घेण्यात आले. चंचल धांडे यांनी ‘कावळा मोर झाला पण’ ही गोष्ट प्रभावी शैलीत कथन करत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व, वाचनाचे फायदे व योग्य वाचन पद्धती याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्यासाठी ईश्वर पाटील यांनी रंजक व उपयुक्त अशी ॲक्टिव्हिटी घेतली.
ईश्वर पाटील यांनी महाभारतातील एका प्रसंगाचे नाट्यीकरण सादर करत “जेव्हा माणसाचा विनाश होणार असतो, तेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होत असते” हा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. संपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, विचारशक्ती व आत्मविश्वासाला चालना मिळाली. उपक्रम प्रमुख तथा मुख्याध्यापक समाधान इंगळे यांच्या समन्वयाने उपक्रमाचे यशस्वी नियोजन शारदा मोहिते, प्रमोद झलवार यांनी केले.
