ॲड.अर्जुन पाटील यांचे प्रबोधनात्मक भाषण; पिठलं-भाकरीच्या समतेच्या पंगतीतून मानवतेचा संदेश
साईमत/बोदवड/प्रतिनिधी :
दगडाच्या देवाला नैवेद्य दाखवण्यापेक्षा भुकेल्याला भाकरी द्या, हाच खरा धर्म आहे, असे क्रांतिकारी विचार मांडणारे संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बोदवड दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात वैचारिक प्रबोधनाचा जागर करण्यात आला. बोदवड वकील संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी भूषविले.
आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणात त्यांनी संत गाडगे महाराज हे केवळ संत नसून समाज परिवर्तनाचे चालते-फिरते विद्यापीठ होते, असे प्रतिपादन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अस्वच्छता याविरोधात महाराजांनी आयुष्यभर लढा दिला. आज न्यायालयात येणाऱ्या अनेक वादांचे मूळ अज्ञान आणि व्यसनाधीनतेत असल्याचे सांगत, समाज प्रबोधनाची गरज त्यांनी अधोरेखित केली.
मनाची स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता हीच गाडगे महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगत त्यांनी कर्ज काढून सण साजरे करण्यापेक्षा किंवा तीर्थयात्रांवर खर्च करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. वकिलांनीही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून न्यायालयात येणाऱ्या सामान्य नागरिकाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी संवेदनशीलतेने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संत गाडगे महाराजांच्या दशसूत्रीचा उल्लेख करत त्यांनी भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र, गरिबांना शिक्षण, बेघरांना आश्रय, आजारी व अपंगांना उपचार, मुक्या प्राण्यांना अभय, बेरोजगारांना रोजगार, व्यसनमुक्ती आणि कष्टाची भाकरी खाणे या मूल्यांवर समाज उभा राहू शकतो, असे सांगितले. हीच मूल्ये खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचा पाया आहेत, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संत गाडगे महाराजांच्या साधेपणाचे प्रतीक असलेले पिठलं आणि बाजरीची भाकरी. वकील, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि पक्षकारांनी एकत्र बसून या प्रसादाचा आस्वाद घेतला. समतेच्या पंगतीतून जातीभेद, पदभेद विसरून मानवतेचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी बोदवड वकील संघाचे सचिव ॲड.किशोर महाजन, ज्येष्ठ विधिज्ञ के.एस. इंगळे, उपाध्यक्ष ॲड.धनराज प्रजापती, ॲड.अमोल पाटील, ॲड.सुनील जाधव, ॲड.समीर पिंजारी, व्ही.पी.शर्मा, विजय मंगळकर, एन.ए.लढे, ॲड.सी.के.पाटील, ॲड.शरद दोदानी, ॲड.मिनल अग्रवाल, गोपाल व्यास, रोशन पाटील यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते. न्यायालयीन प्रशासनातर्फे अधीक्षक वैभव तरटे, प्रशांत कुमार बेदरकर, श्रीराम भट, एस. एस. खेडेकर, एस. के. बेलदार, शिपाई राजू धुंडाळे, वाय. ओ. वंजारी यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि मोठ्या संख्येने पक्षकारांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वकील संघाचे सचिव ॲड. किशोर महाजन यांनी केले. बोदवड न्यायालयातील कर्मचारी, वकील आणि पक्षकार यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
