बालसाहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांसह तरुणांमध्ये बालपणापासून साहित्याची आवड निर्माण व्हावी. तसेच साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, अशा उद्देशाने समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे १३, १४ आणि १५ ऑगस्ट २०२५ असे तीन दिवशीय ‘पहिले अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या साहित्य संमेलनात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच महाराष्ट्रातील साहित्यिक सहभागी होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी अभिरुची निर्माण होण्यास मदत होणार आहे.साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे.
जगातील कानाकोपऱ्यातून साहित्यिकांसह साहित्य रसिकांना प्रवास न करता अगदी घरी बसून साहित्य संमेलनाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे वेळेसह खर्चाचीही बचत होणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून समाज चिंतामणी प्रतिष्ठान साहित्य चळवळ आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी नवोपक्रम राबवित आहे. साहित्य संमेलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.
संमेलनात नामवंत साहित्यिकांचा असणार सहभाग
साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा नागपूर येथील लेखिका प्रा. विजया मारोतकर तर संमेलनाध्यक्ष पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस असतील. साहित्य संमेलनाचे उद्घाटन नांदेड येथील बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते होईल. तसेच साहित्य संमेलनाच्या समारोप अध्यक्षा जळगाव येथील बालसाहित्यिका माया धुप्पड असतील. अधिक माहितीसह सहभागासाठी (कंसात मो.नं.) आर. डी. कोळी (९८६०७०५१०८), प्रा.इम्रान जे. खान (८१४९१९९८८९), प्रा.रत्नाकर कोळी (८३२९६४६५०५), प्रा. गोपीचंद धनगर (९७६६२०७५७४) यांच्याशी संपर्क साधावा.
असे असतील साहित्य संमेलनातील कार्यक्रम
साहित्य संमेलनातील होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये बुधवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन समारंभ, ७.३० ते ८.३० अभिवाचन, ८.३० ते ९.३० बालकुमार कविसंमेलन, १४ ऑगस्ट रोजी मी लिहिलेले पुस्तक सायंकाळी ६.३० ते ७.३०, मी कसा घडलो… ७.३० ते ८.३०, निमंत्रितांचे कवी संमेलन ८.३० ते ९.३० तर शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी कथाकथन ६.३० ते ७.३०, देशभक्ती गीतगायन ७.३० ते ८.३० तर ८.३० ते ९.३० वाजता समारोप होईल.