शहर पोलीस गुन्हे शोध पथकाची यशस्वी कामगिरी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी, ११ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास जळगाव शहरातील गेंदालाल मिल दूध फेडरेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यासमोर चार संशयित आरोपी गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, मॅगझिनसह गैरकायदा परवानाशिवाय आपल्या कब्जात बाळगतांना आढळून आले. याप्रकरणी त्यांच्याविरुध्द जळगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्यादी पो.काँ.प्रणय सुरेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. चार आरोपींमध्ये युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय ३३, रा. गेंदालाल मिल), निजामोद्दीन शेख हुसेनोद्दीन शेख (वय ३१, रा. आझाद नगर), शोएब अब्दुल सईद शेख (वय २९, रा.गेंदालाल मिल), सोहील शेख उर्फ दया सीआयडी युसुफ शेख (वय २९, रा. शाहु नगर, सर्व जळगाव) यांचा समावेश आहे.
सविस्तर असे की, गुन्हे शोध पथकातील अंमलदार स.फौ.सुनील दामोदर पाटील, पो.हे.काँ.सतीष रमेश पाटील, पो.काँ.अमोल ठाकुर आणि पो.काँ. प्रणय पवार असे पो. स्टे.च्या हद्दीत रात्रगस्त करीत होते. तेव्हा गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गेंदालाल मिल परिसरात सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यासमोर रस्त्यावर काही इसम एका कारमध्ये संशयितरित्या अवैध शस्त्र बाळगुन फिरत असल्याची माहीती प्राप्त झाली होती. त्याबाबत पो.नि. सागर शिंपी यांना माहिती कळविली. तेव्हा त्यांनी संपूर्ण डी. बी. स्टॉप यांना माहितीची खात्री करण्यासाठी घटनास्थळी रवाना केले होते.
१ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
घटनास्थळावर एक कार दिसून आल्यावर तिला त्यांनी थांबविले. तेव्हा कारमध्ये चार जण संशयितरित्या आढळून आले. त्यावेळी त्यांची विचारपूस केल्यावर त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना पोलीसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस असल्याची कबुली दिली. त्यांची अंगझडती घेतल्यावर युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल याच्याकडून एक पिस्तूल त्यात ४ जिवंत राउंड तसेच कारची झडती घेतल्यावर त्यात १ पिस्तूल, ६ जिवंत राऊंड तसेच १ खाली मॅगझिन व मारुती सुझुकी कंपनीची कार (क्र. एम.एच. ४३ ए.आर. ९६७८) असा १ लाख ७८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. दरम्यान, युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल याच्याविरुध्द जळगाव आणि भुसावळ येथील पोलीस स्टेशनला विविध गुन्हेही दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर पो.स्टे.च्या गुन्हे शोध पथकातील स.फौ.सुनील पाटील, पो.हे.कॉ. उमेश भांडारकर, सतिश पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, विरेंद्र शिंदे, दीपक शिरसाट, भगवान पाटील, पो.कॉ. प्रणय पवार, अमोल ठाकुर, भगवान मोरे, राहुलकुमार पांचाळ यांनी केली आहे. तपास सहा. पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहे.



