चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतील पैशांची पिशवी लंपास केली
साईमत/मलकापूर /प्रतिनिधी :
शहरातील बुलढाणा रोडवरील एका हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी थांबला असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेली साडेचार लाखांची रोकड लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत मलकापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली महिती अशी की, दाताळा येथील दीपक सुभाष किन्ने यांनी आपल्या मित्राला घर बांधण्यासाठी ८ लाख ५० हजार रुपये दिले होते. त्यापैकी ४ लाख ५० हजार रुपये घेऊन तो मित्र दाताळ्याकडे परत येत होता. दरम्यान, बुलढाणा रोडवरील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका हॉटेलवर तो नाश्ता करण्यासाठी थांबला. याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतील पैशांची पिशवी लंपास केली.
घटनेनंतर दिपक किन्ने यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी ७०७/२०२५ अन्वये कलम ३०२, २ बीएनएस अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लगेचच तपासाची चक्रे फिरवली असून घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून लवकरच आरोपी गजअडाणा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे आहे.
हॉटेलच्या गर्दीत, दिवसाढवळ्या अशी रोकड लंपास झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली असून पोलिसांनी अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
