साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
‘जय महाराष्ट्र न्यूज चॅनल’तर्फे आयोजित ‘महाराष्ट्र व्हीजन २०३०’ कार्यक्रमात सौर ऊर्जेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थाध्यक्ष विजय नवल पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. ‘जय महाराष्ट्र न्यूज चॅनल’तर्फे कृषी, शिक्षण, निसर्ग ऊर्जा, सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५ कर्तृत्ववान मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
चार वेळा खासदारपदी निवडून येण्याची किमया करणारे तसेच सौर ऊर्जेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष बाब म्हणजे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याही हस्ते त्यांना सौर ऊर्जेवर चालणारा प्रथम रेडिओ भेट देण्यात आला होता. सन्मान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ‘जय महाराष्ट्र न्यूज चॅनल’वरून १०.३० वाजेपासून प्रसारित केले होते. विजय नाना पाटील आर्मी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्येही प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना त्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी प्राचार्य पी.एम.कोळी, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. आजही वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे कार्य अविरत सुरु असून त्यांच्या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. याबद्दल विजय नवल पाटील यांच्यावर महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.