माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्येच्या गाडीचा अपघात

0
98

सुदैवाने जीवितहानी टळली

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. पिकअप चालकाने समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही घटना धुळे-सोलापूर महामार्गावर चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथे सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी बारा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

सविस्तर असे की, कन्नड विधानसभा मतदारसंघासाठी संजना जाधव या इच्छुक आहेत. त्या अनुषंगाने त्या मतदारसंघातील गावांना भेटीगाठी देण्यासाठी सोमवारी सकाळी घरातून निघाल्या होत्या. त्या बाजार समितीचे उपसभापती जयेश बोरसे, माजी सरपंच ज्ञानेश्वर निकम, आदित्य गरजे या कार्यकर्त्यांसह धुळे-सोलापूर महामार्गावरून चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथून जात होत्या. यावेळी भरधाव एक पिकअप (क्र.एम. एच ४२ बी.एफ. ०६१३) चालकाने संजना जाधव यांच्या वाहनाच्या चालकाच्या बाजूने जोराची धडक दिली. त्यामुळे दोन वाहनांमध्ये जोराची धडक झाली. त्यात संजना जाधव यांच्या वाहनाचे आणि पिकअपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने, भीषण अपघातात संजना जाधव बचावल्या आहेत.

गेल्या २६ सप्टेंबर रोजी कन्नड मतदार संघातून इच्छुक असलेले नितीन पाटील यांच्या वाहनाचाही अपघात झाला होता. नितीन पाटील यांच्या वाहनासमोर म्हैस आल्याने हा अपघात घडला होता. अपघातात म्हशीचा मृत्यू झाला होता तर नितीन पाटील यांच्या वाहनाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशातच आता आठ दिवसाच्या अंतरानेच दोन इच्छुकांचा उमेदवारांच्या गाडीचा अपघात झाल्याने कन्नड कार्यकर्त्यांमध्ये ‘इच्छुकांनो तुम्ही जरा जपून’ असं म्हणण्याची वेळ आली आहे.

इच्छूक उमेदवार अन्‌ वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या

विधानसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. लवकरच निवडणुकीच्या अधिकृत तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे इच्छूक उमेदवार आणि वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here