जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहसंमेलनाचा लुटला आनंद
साईमत।चोपडा।प्रतिनिधी।
येथील प्रताप विद्यामंदिर येथील १९९१ ते १९९२ यावर्षी बारावी सायन्सला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे ३३ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्नेहसंमेलनाचा अनोखा सोहळा अत्यंत आनंदमयी वातावरणात चोपडा येथील हॉटेल योगानंद येथे नुकताच पार पडला. यावेळी केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्या वेळचे प्राध्यापकही उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त प्रा. डॉ.एस.बी. कुलकर्णी, सेवानिवृत्त प्रा.ए.डी.माळी, सेवानिवृत्त प्रा.एच.ए.पाटील, सेवानिवृत्त प्रा.आर.ए.पाटील, दोंडाईचा कॉलेजचे प्राचार्य डॉ.पी.एस.लोहार, सेवानिवृत्त प्रा.एस.एस.जैन, सध्या प्रताप विद्या मंदिराचे प्राचार्य पद भूषवत असलेले गुजराथी सर, प्रा.डी.एस.पाटील आदींसह जवळपास २३ विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्राध्यापकांनी त्यांचे अनुभव सांगुन मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी सध्या आपण काय करीत आहोत यासंदर्भात माहिती दिली. प्रताप विद्या मंदिरात सुरू असलेल्या ॲग्रीकल्चर सायन्स युनिटने उतुंग अशी भरारी घेतलेली आहे. त्यामुळे असंख्य विद्यार्थी प्रशासकीय सेवेत चमकत आहेत.
कार्यक्रमात स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर सातपुड्याच्या कुशीत असलेल्या गुळ नदीवर असलेल्या मालापूर डॅमवर फेरफटका मारण्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांचा मोर्चा वळला. मालापूर धरण येथे सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांशी हितगुज आपसूक माहिती घेतली. यावेळी मनोरंजनाचा मनमुराद आनंद लुटला.
यांचा होता सहभाग
३३ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सर्व शिक्षक आणि बहुतांश विद्यार्थी यांनी स्नेहसंमेलन घडवून आणले. त्यात कल्याण महानगरपालिकाचे विशेष शिक्षक नितीन पाटील, अंकलेश्वरचे उद्योजक योगराज पाटील, भडगाव पंचायत समितीचे कार्यालय अधीक्षक दिलीप चिंचोरे, अंकलेश्वरचे उद्योजक सुधाकर निकम, पुणे उद्योजक वसंत बोरसे, चोपडाचे पत्रकार जयराम कोळी, चावलखेडा नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे कला शिक्षक प्रवीण पाटील, तावसेचे कृषी व्यावसायिक लक्ष्मण पाटील, पारोळा आश्रमशाळेचे सोपान पाटील, गांधलीचे सरपंच नरेंद्र पाटील, नवी मुंबईचे उपशिक्षक सुभाष सोनवणे, निमगव्हाणचे संतोष पाटील, आडगावचे पद्माकर पाटील, धरणगाव पंचायत समितीचे शांताराम पाटील, चोपडाचे सुखदेव राजकुळे, डॉ. फिरोज अहमद, घाडवेलचे कृषी व्यावसायिक माणिक पाटील, मामलदेचे उमेश पाटील, गाढोदाचे विकास पाटील, वडती साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक राजेश चौधरी, जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे दीपक अहिरे, चोपडाचे व्यावसायिक अजय जोहरी आदी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात सहभाग घेतला होता.
आगामी स्नेहसंमेलन अमळनेरला परिवारासह होणार
पुढील स्नेहसंमेलन संपूर्ण परिवारासह मंगळ ग्रह मंदिर, अमळनेर येथे घेण्यात यावे, असे गांधलीचे सरपंच नरेंद्र पाटील, अमळनेरचे सोपान पाटील यांनी आग्रह धरला. त्यामुळे पुढील स्नेहसंमेलन अमळनेर येथे घेण्यात येईल, असे सर्वानुमते स्नेहसंमेलनात ठरविण्यात आले.