साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जळगावकडे जाणाऱ्या मारोती ओमनीला जळगाव-भुसावळ महामार्गावर शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास अपघात झाला होता. त्याच मार्गावरुन दैनंदिन मॉर्निंग वॉक करणारे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या सहकार्यांसमवेत प्रसंगावधान राखून तातडीने अपघातग्रस्त वाहनचालकाला मदत केली.
सविस्तर असे की, जळगाव-भुसावळ महामार्गावरुन जळगावकडे जाणारी मारोती ओमनी (क्र.एमएच ३९ जे ५४३८) ही दुभाजकाजवळ धडकली होती. यावेळी वाहनात वाहनचालकासह दोन ते तीन व्यक्ती बसलेले होते. याच मार्गावरुन माजी खासदार डॉ.उल्हास पाटील हे मॉर्निंग वॉक करीत होते. अपघाताची ही घटना त्यांच्या लक्षात येताच तातडीने त्यांचे सहकारी रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, शिवानंद बिरादर, नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रविण कोल्हे, छायाचित्रकार उमेश नामदेव आदींनी प्रसंगावधान राखून रस्त्याच्या मधोमध असलेली अपघातग्रस्त ओमनी ढकलत रस्त्याच्या कडेला आणली. तसेच यावेळी दे धक्का देत वाहनचालकाला त्यांनी मदतही केली. तसेच अपघातामुळे किरकोळ जखमी झालेल्यांना सहकाऱ्यांच्या मदतीने डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात उपचारार्थ तातडीने दाखल केले. भल्या पहाटे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली ही मदत प्रेरणादायी असल्याचे वाहनचालकाने सांगत डॉ.उल्हास पाटील यांचे आभार मानले.