Anant Joshi ends his ‘life’ : जळगावचे माजी नगरसेवक अनंत जोशींनी ‘आयुष्य’ संपविले

0
23

शासकीय रुग्णालयात राजकीय क्षेत्रासह नागरिकांनी केली गर्दी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील प्रभाग क्रमांक १२ चे माजी नगरसेवक बंटी उर्फ अनंत हरिश्चंद्र जोशी (वय ४८, रा. ओंकारेश्वर मंदिराजवळ, जळगाव) यांनी शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करुन ‘आयुष्य’ संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. यावेळी परिवाराने एकच आक्रोश केला होता. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. हसतमुख, मनमिळावू असा स्वभाव असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

शिवसेना ठाकरे गटातून अनंत हरिचंद्र जोशी उर्फ बंटीभाऊ हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गेल्या दोन पंचवार्षिकला त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. दरम्यान, १ ऑगस्ट रोजी अनंत जोशी हे दुपारी १ वाजेनंतर वरच्या मजल्यावरील खोलीत निघून गेले होते. सायंकाळी परिवाराने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मिळून आले नाही. घरासह शहराबाहेरही त्यांनी तपासणी केली. अखेर सायंकाळी वरच्या मजल्यावरील घरात पाहत असताना अनंत जोशी यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

घटनास्थळी पोलीस दाखल

घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अनंत जोशी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव याठिकाणी दाखल केला होता. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा राजवीर असा परिवार आहे. दरम्यान, रुग्णालयात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here