माजी आ.शिरीषदादा यांची हातमिळवणी की साखरपेरणी ?

0
31
माजी आ.शिरीषदादा यांची हातमिळवणी की साखरपेरणी -www.saimatlive.com

      तिन्ही दादांच्या भांडणाचा मुद्दा निकाली निघाल्याच्या पार्श्वभूमिवर सुरु झाली चर्चा

साईमत विशेष प्रतिनिधी (विवेक ठाकरे)

अमळनेर नगरपालिकेच्या २०१६ च्या निवडणुकीत झालेल्या दंगलीतील खटल्यात माजी आ.शिरीषदादा चौधरी यांनी न्यायालयात साक्ष बदलली.यामुळे मंत्री अनिलदादा पाटील यांच्यासोबत त्यांचे मनोमिलन होईल,असे बोलले जात असले तरी त्यापेक्षा  आगामी विधानसभेच्या धर्तीवर गुन्ह्यात नावे असलेल्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये साखर पेरणी व्हावी म्हणून शिरीषदादा चौधरी यांनी साक्ष फिरवत वेगळाच डाव टाकल्याची चर्चा पुढे येतेय.महिनाभरात त्या भांडणाच्या खटल्याचा कोर्टात फैसला होईल पण त्यानंतर बदलणाऱ्या राजकीय समीकरणाकडे व यावर नेमका विधानसभा निवडणूकीवर त्याचा कसा परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमळनेर तालुक्याला स्थानिक भूमिपुत्र व उपरा उमेदवार अशी रणधुमाळी आतापासूनच सुरु झाली आहे. त्यात माजी आ. शिरीषदादा चौधरी भाजपात सद्यातरी असल्याने तसेच महायुतीच्या राज्यातील नेत्यांना मानतो असे म्हणत लोकसभेवेळी महायुतीच्या खा.स्मिताताई वाघ यांच्या प्रचारात सुद्धा सक्रिय दिसल्याने मंत्री अनिलदादा पाटील यांना महायुतीत ही जागा सुटणार असे पक्के समीकरण असल्याने इथे यावेळी शिरीषदादा लढणार नाही असा राजकीय क्षेत्रात व्होरा होता पण शिरीषदादा चौधरी यांनी पुन्हा मैदानात असल्याची घोषणा करणारी पत्रकार परिषद घेतली. त्यापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला,त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा 2014 आणि 2019 विधानसभेच्या वातावरणाप्रमाणे चित्र निर्माण होईल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

2014 मध्ये माजी आ.शिरीषदादा चौधरी यांना झालेल्या तिरंगी लढतीचा फायदा लक्षात घेऊन 2019 मध्ये साहेबरावदादा यांनी आपली तलवार म्यान करून अनिलदादा यांना साथ दिल्याने शिरीषदादा पुन्हा निवडून येऊ शकले नाही. नेमका यावेळी सुद्धा अमळनेर मतदारसंघात उपरा उमेदवार माघारी पाठवायचा एकीचा धागा अनिलदादा व साहेबरावदाद यांनी गुंफला आहे, तो कायम असून साहेबराव दादा यांचे पाडरसरे धरणाचा विकास हाच उद्देश अनिलदादा यांचा गेल्या पाच वर्षाच्या काळात राहिला.

पाडळसरे प्रकल्प केंद्राच्या अंतिम टप्प्यात असून आता फक्त 2 टक्के काम झाल्यास 4 हजार 890 कोटींच्या अंतिम सुधारित मान्यतेपैकी पहिल्या टप्प्यासाठी 2 हजार 887 कोटी पंतप्रधान कृषी सिंचन विभागाकडून निधी उपलब्धते पर्यंतचा पाठपुरावा अनिलदादा यांनी केला असल्याने अनिलदादा हे सुद्धा साहेबराव दादांप्रमाणेच विकासाचा वादा हे ब्रीद सार्थ करत असल्याने माजी आ.शिरीषदादा चौधरी यांची यंदाची निवडणूक पाहिजे तशी सोपी नसेल एवढे मात्र निश्चित!


तिरंगी लढतीमुळे शिरीषदादांची बाजी
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून लढत देत अनिलदादा पाटील 93 हजार 757 मते मिळवून विजयी झाले.त्यावेळी अपक्ष निवडून आलेल्या मावळत्या आमदार शिरीषदादा हिरालाल चौधरी यांनी भाजपाची उमेदवारी घेतली होती त्यांचा अनिलदादा यांनी 8 हजार 594 मतांनी पराभव केला होता. त्यापूर्वी  2014 मधील विधानसभा निवडणुकीत नंदुरबार येथून अमळनेर येथे येऊन अपक्ष निवडणूक लढवत शिरीषदादा चौधरी 68 हजार 149 मते मिळवत विजयी झाले होते. नेमके अनिलदादा यांनी भाजपाकडून उमेदवारी केली होती.तरीही 21 हजार 239 मतांनी त्यांना पराभव सहन करावा लागला होता.याच निवडणुकीत 2009 मध्ये अपक्ष निवडून आलेले कृषीभूषण साहेबरावदादा पाटील राष्ट्रवादीकडून लढले त्यांना 43 हजार 667 मते मिळाली होती. तिरंगी लढत झाल्यानेच बाहेरील आलेला माणूस असतांनाही शिरीषदादा चौधरी यांनी बाजी मारली होती.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here