चोपड्यात क्रांती दिनी आदिवासी कोळी जमातीचा अन्नत्याग सत्याग्रह

0
12

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

चोपडा आणि अमळनेर येथील कोळी लोकांना एसटीचे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी आदिवासी व क्रांती दिवस असल्याने त्याचदिवशी सकाळी ११ वाजेपासून चोपडा येथील प्रांत व तहसील कार्यालयासमोर आदिवासी कोळी जमातीतर्फे शांतता कायदा व सुव्यवस्था राखुन तीव्र अन्नत्याग सत्याग्रह, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन, रास्तारोको आंदोलन, लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्यांचा मोर्चाही काढण्यात येणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील शेकडों विद्यार्थी, महिला मंडळ, वयोवृद्ध मंडळी तसेच जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हा पोलीस अधिकारी तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, चोपडा पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे.

अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले सुलभपणे मिळावेत, त्यासाठी आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी कोळी समाजाच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन गेल्या ८ मे २०२३ रोजी अमळनेर प्रांत कार्यालयासमोर पाच दिवसांचा तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करून शेकडों दाखले मिळवून दिले होते. त्यानंतर तेथील प्रांताधिकाऱ्यांची बदली झाल्याने तेथे नवीन हजर झालेले प्रांताधिकारी यांनी कोळी लोकांना तसे दाखले देणे बंद केले आहे. तसेच चोपडा येथे नवीन प्रांत कार्यालय स्थापन झाल्याने येथीलही प्रांताधिकारी कोळी लोकांना तसे दाखले देण्यास टाळाटाळ करीत आहेत. घटनादत्त अधिकारानुसार शासनाचे निर्णय जी.आर. असून राजकारण्यांच्या दबावापोटी प्रशासन आदिवासी कोळी जमातीला वेठीस धरत आहे. हे दाखले मिळत नसल्याने कोळी समाजातील सुशिक्षित युवकांचे नोकरीविषयक व शालेय मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर आदिवासी टोकरेकोळी समाजाचे पदाधिकारी शांताराम सपकाळे, छगन देवराज, जगन्नाथ बाविस्कर, कैलास सोनवणे, भरत बाविस्कर, कैलास बाविस्कर, मोतीलाल रायसिंग, गव्हरलाल बाविस्कर, पंकज रायसिंग, अनिल कोळी, विशालराज बाविस्कर, रामचंद्र कोळी, गोपाल कोळी, रतिलाल बाविस्कर, सतीश ठाकरे, प्रशांत सोनवणे, समाधान बाविस्कर, सुनील कोळी, देवरथ कोळी, साहेबराव बाविस्कर, संतोष देवराज यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here