साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
येथे महसूल प्रशासनास कुंड खुर्द ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी मलकापुरचे तहसीलदार यांना सादर केलेल्या संयुक्त अहवालात कुंड खुर्द शिवारातील शासकीय ई क्लास गट नंबर ३७ चे जमीनीमधील अंदाजे तीन हजार ब्रास गौण खनिज उत्खनन करून गट नंबर ३८ चे नजीम खान गौसखान यांच्या शेतात वापरून सपाटीकरण केले असल्याची बाब समोर आली आहे.
मलकापुरचे उपविभागीय अधिकारी यांना कुंड खुर्द शिवारातील शासकीय ई क्लास जमिनीवरील माती व मुरमाचे टेकडीचे खोदकाम करून शेजारील शेतमालकाने स्वतःच्या शेतात असलेल्या नाल्यांमध्ये भरणा करण्यासाठी वापर करुन शासकीय ई क्लास जमीनीवर बेकायदेशीर ताबा केला असल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले होते. निवेदनाची दखल घेत तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कुंड खुर्द येथील प्रमुख ग्रामस्थां समक्ष घटनास्थळी नुकतीच भेट देवून पंचनामा केला. तेव्हा शासकीय ई क्लास गट नंबर ३७ चे जमीनीमधील अंदाजे तीन हजार ब्रास गौणखनिज उत्खनन करून गट नंबर ३८ चे नजीम खान गौसखान यांच्या शेतामध्ये वापरून सपाटीकरण केले. कुंड खुर्द ते मलकापूर जाणाऱ्या पक्क्या रस्त्यापासून शासकीय ई क्लास जमिनीतून स्वतः च्या गट नंबर ३८ चे शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी दोन रस्ते तयार करून त्यासाठीही गौनखनिजचा भरणा करून रस्त्याचा वापर सुरू केला असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचा मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून संयुक्त घटनास्थळाचा पंचनामा अहवाल मलकापुरचे तहसिलदारांना नुकताच सादर केला आहे.