साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
वरणगाव सिव्हील सोसायटीतर्फे रन फॉर वरणगाव ही पाच कि.मी. व १० कि.मी. धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे तब्बल ५८ धावपटू सहभागी झाले होते. त्यात ३५ महिला धावपटू होत्या. त्यात पाच कि.मी.च्या स्पर्धेत महिलांच्या गटात सुनिता संजय सिंग ह्या प्रथम ठरल्या. शिवाय १० कि.मी. महिलांच्या गटात रिना परदेशी प्रथम तर विनिता शुक्ला ह्या द्वितीय ठरल्या. त्याचबरोबर १० कि.मी. पुरुषांच्या गटात राजेंद्र ठाकूर प्रथम तर निलेश पाटील द्वितीय ठरले. पाचही धावपटू ज्यावेळी बक्षीस स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे जात होते, त्यावेळी उपस्थित इतर धावपटू एकच जल्लोष करीत होते. व्यासपीठावर भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा.प्रवीण फालक, डॉ.राजेश मानवतकर, डॉ.राहुल भोईटे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
वरणगाव येथून रविवारी, ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता स्पर्धेस सुरुवात झाली. थंड वातावरणात धावायला सुरुवात केल्यानंतर भुसावळचे धावपटू आपल्या तिरंगी रंगाच्या अधिकृत टी शर्ट परिधान करून धावत असल्याने स्थानिक वरणगावचे नागरिक व इतर धावपटू त्यांच्याकडे विशेष कुतूहलाने बघत होते. टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करत होते. महिला धावपटूंना इतक्या वेगात धावतांना बघून रस्त्यावरील नागरिक विशेष कौतुक करीत होते.
स्पर्धेत प्रीती पांडा, गुड्डी देवी, पिंकी सिंग, मनीषा सिंग, शीला कश्यप, राधा पाटील, सुनिता वाघमारे, माधुरी गव्हाळे, विजया निकम, सुनिता रंजनसिंग, सीमा वायकर, गुंजन गुप्ता या महिला धावपटूंनी भुसावळ शहराबाहेर प्रथमच एखाद्या स्पर्धेत सहभाग नोंदविल्याचे सांगितले. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या महिला सदस्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे हे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याशिवाय डॉ.चारुलता पाटील, डॉ.नीलिमा नेहेते, डॉ.स्वाती फालक, पूनम भंगाळे, माया पवार, मंजू शुक्ला, ज्योती सिंग, ममता ठाकूर, डॉ.वर्षा वाडिले, एकता भगत, माधुरी चौधरी, सविता घाटे, किर्ती मोताळकर, पुष्पलता चौधरी या महिला धावपटूंनीही १० कि.मी. अंतर सहज धावून पूर्ण केले.