पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या ‘आदिवासी पत्नी’चे निधन

0
2

धनबाद : वृत्तसंस्था

भारताचे दिवंंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ‘आदिवासी पत्नी’ अशी ओळख असलेल्या बुधनी मांझियाइन यांचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांपूर्वी घडलेली एक घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पंडित नेहरुंच्या एका कृतीमुळे बुधनी मांझियाइन यांना आदिवासी समाजातून वाळीत टाकण्यात आले होते. नेमकी काय होती ती घटना.
बुधनी मांझियाइन यांचा धनबादच्या दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या (डीव्हीसी पंचेत प्रकल्प) निर्मितीत मोठा वाटा होता. बुधनी यांच्या हस्ते दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरु यांनी डॅमचे उद्घाटन केले आणि त्यांना हार घालून त्यांचा सन्मान केला. ज्यानंतर आदिवासी समाजाने बुधनी मांझियाइन यांना वाळीत टाकले होते मात्र जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा बुधनी मांझियाइन यांंना डीव्हीसीमध्ये नोकरी मिळाली होती. पंडित नेहरुंनी गळ्यात माळ घातल्याने बुधनी मांझियाइन यांना पंडित नेहरुंची आदिवासी पत्नी म्हटले जाऊ लागले.

काय होतं प्रकरण?
पंचेत डॅमचं उद्घाटन करण्यासाठी पंडित नेहरु आले होते तेव्हा त्यांना बुधनी मांझियाइन यांच्या योगदानाविषयी समजले. त्यांचे योगदान ऐकून पंडित नेहरु भारावले. ज्यानंतर ६ डिसेंबर १९५९ या दिवशी बुधनी मांझियाइन स्विच ऑन करुन त्यांंनी डॅमचे उद्घाटन केले तसेच बुधनी यांचा सन्मान म्हणून त्यांच्या गळ्यात माळही घातली. बिगर आदिवासी माणसाने (पंडित नेहरु) बुधनी यांच्या गळ्यात माळ घातल्याने आदिवासी समाजाने त्यांना बहिष्कृत केले.
याच बुधनी मांझियाइन यांचे निधन झाले आहे.ज्यानंतर ही ६४ वर्षांपूर्वीची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बुधनी यांचा सन्मान का करण्यात आला?
पंचेत प्रकल्पासाठी स्थानिक कामगार पुढे येत नव्हते. त्यावेळी बुधनी मांझियाइन यांनी रावण मांझी यांच्यासह पुढाकार घेतला. या दोघांनी पुढाकार घेतल्याने इतर मजूर या प्रकल्पासाठी काम करण्यास पुढे आले. ज्यानंतर या प्रकल्पाचं बांधकाम सुरु झालं. एका प्रकल्पाचं बांधकाम व्हावं म्हणून बुधनी मांझियाइन यांनी जो पुढाकार घेतला आणि लोकांना ज्या पद्धतीने समजावून सांगितलं त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला. त्यावेळी लोक बुधनी मांझियाइन यांची स्तुती करत होते मात्र पंडित नेहरुंनी त्यांच्या गळ्यात माळ घातली आणि आदिवासी समाजाने बुधनी मांझियाइन यांच्यावर बहिष्कार टाकला.
बुधनी मांझियाइन यांचे निधन १७ नोव्हेंबर रोजी झाले. पंडित नेहरु यांच्या आदिवासी पत्नी असं बिरुद लागलेल्या बुधनी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्थानिक राजकारणी आणि नेते आले होते. बुधनी या त्यांची मुलगी रत्नाच्या घरी राहात होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here