साईमत जळगाव प्रतिनिधी
तालुक्यातील आवार गावाने दिवाळी फटाके न फोडता दीपोत्सवाने साजरी केली याचं औचित्याने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आवार गावचे सरपंच गोकुळ सपकाळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित गावकरी यांचा सत्कार करण्यात आला.
आवार तालुका जिल्हा जळगाव सारख्या साडेसातशे लोकवस्तीच्या छोट्याशा गावाने दिवाळीच्या आदल्या दिवशी फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली आणि एकही फटाका न फोडता दिवाळी साजरी करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला. याच आदर्श कामाबद्दल महा अनिस राज्य कार्यवाहक वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग प्रमुख दिगंबर कटारे यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविका आणि पुस्तके देऊन ग्रामपंचायत कार्यालयात गौरव करण्यात आला.
यावेळी महाअनिस्मार्फत चमत्कार सादरीकरण आणि प्रबोधन ही करण्यात आले. यामध्ये हातातून रक्त काढणे कलशातून पाणी गायब करून पुन्हा निर्माण करणे सुई जिभेतून आरपार काढणे जडका कापूस खाणे आधी चमत्काराचे प्रयोग आनंद ढिवरे आणि दिगंबर कटारे यांनी सादर करून त्यामागील विज्ञान समजून सांगितले. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने बालक दिनाचे औचित्य साधून डॉ. अब्दुल कलाम भिशी योजनेचे प्रमुख विजय लुल्हे यांनी वाचनाचे महत्त्व सांगून उपस्थित विद्यार्थी, महिला यांना पुस्तके वाटप केली. कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरीष चौधरी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महा अंनिस कार्यकर्ते जितेंद्र धनगर यांनी केले.