शेअर मार्केटच्या आमिषात फसवणूक; तरुणीवर विनयभंगाची धक्कादायक घटना भुसावळात
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी
भुसावळ शहरातील एका २७ वर्षीय तरुणीवर सुमारे १० लाख रूपयांची आर्थिक फसवणूक करून, लग्नासाठी दबाव टाकून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करत आहेत.
तक्रारदार तरुणी भुसावळ शहरातील एका भागात आपल्या कुटुंबासह राहते. माहिती मिळाल्याप्रमाणे, संशयित आरोपी सिद्धांक मनोज हेडा (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) यांनी सन २०२० मध्ये तरुणीशी ओळख करून घेतली. त्यानंतर त्याने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत, शेअर मार्केटमध्ये फायदा मिळवण्याचे आमिष दाखवून तिला फसवले.
आरोपीने तरुणीच्या डी-मॅट अकाउंटची माहिती मिळवून आणि क्रेडिट कार्डचा गैरवापर करून तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केली. आर्थिक फसवणुकीपुरतीच मर्यादा न ठेवता, अरोपीने तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकला आणि तिचा मुंबई ते मंगलोरपर्यंत पाठलाग केला. हद पाशी पोहोचत, त्याने तक्रारदाराच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत तिचा विनयभंग केला, तसेच तिची वैयक्तिक फोटो मॉर्फ करून इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली.
या गंभीर त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरु केला असून संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
