पहुरमधील आर.टी.लेले हायस्कुलने मिळवून दिली मदत
साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी :
येथील लेलेनगरमधील रहिवासी कै. रामेश्वर राजेंद्र सोनवणे हा विद्यार्थी पहुरमधील आर.टी.लेले. हायस्कुलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत होता. दुर्दैवाने त्याचे अपघाती निधन झाले होते. त्याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबियांना पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व्हावी, म्हणून शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.बी. पाटील, शाळेचे पर्यवेक्षक एस. व्ही. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. सोनवणे, ज्येष्ठ लिपिक किशोर पाटील, कनिष्ठ लिपिक शरद पाटील यांनी प्रयत्न सुरू केले होते.
याकामी संस्थेचे चेअरमन तथा ग्रामविकास, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, संस्थेचे व्हॉ.चेअरमन साहेबराव देशमुख, जळगाव दूध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख तसेच माजी सभापती बाबुराव घोंगडे यांनीही पुढाकार व विशेष परिश्रम घेऊन मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला राजीव गांधी अपघात विमा योजना अंतर्गत दीड लाखाची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजूर करून आणून दिली. त्या विद्यार्थ्याला विमा सुरक्षा कवच मिळवून दिले. माणुसकीच्या सद्भावनेतून आणि मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबास मदत व्हावी, या सद्हेतूने सर्वांनी अमूल्य सहकार्य केले. परिश्रम घेतले. त्याबद्दल सर्वांना आणि शाळेलाही पहुर परिसरातून धन्यवाद प्राप्त होत आहेत.