‘साईमत’च्या वृत्ताची सा.बां.विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील पिंप्राळा येथील सोनी नगर जवळील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले होते. याबाबत दैनिक ‘साईमत’मध्ये गेल्या ३१ ऑक्टोबर रोजी वृत्त प्रकाशित झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत प्रत्यक्षात काम सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी ‘साईमत’चे आभार मानले आहेत.
रस्त्यामुळे दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याच्या घटना घडत होत्या. याबाबत वृत्तपत्रात बातम्या छापून आल्याने प्रशासन जागे झाले. ५० मीटर पुलाचे काम सुरू २.४६ कोटीचा निधी मंजूर आहे. आ. सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाने या रस्त्याचे कामे सुरू झाली आहेत. सोनी नगर जवळील ५० मीटर पुलाच्या कामाचा शुभारंभ पिंप्राळा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, सुरेश सोनवणे यांच्या हस्ते झाला. यावेळी किरण भोई, जाकीर पठाण तसेच सोनी नगरातील नागरिक उपस्थित होते.
अर्धवट राहिलेला सिमेंट काँक्रिटचा रस्ताही सुरळीत करा
सोनी नगरच्या मेन गेटजवळ सांडपाण्याचा डबके साचल्याने त्यात सिमेंटचे पाईप टाकून पाण्याचा निचरा करण्यात येऊन तो रस्ता पुलाला जोडण्यात येणार आहे. या पुलावरून सोनी नगर, विजय नगर, सावखेडा, श्रीराम नगर, बाबुराव नगर, गणपती नगर, ओमकार पार्क आदी भागातून सावखेडा जाण्यासाठी हाच रस्ता होता. तो सुरू झाल्याने नागरिकांची समस्या सुटणार असल्याचे सोनी नगरातील रहिवासी नरेश बागडे यांनी सांगितले. ५० मीटर पुलाचे काम तर सुरू झाले. मात्र, अर्धवट राहिलेला सिमेंट काँक्रिटचा रस्ता पण सुरळीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
