…अखेर जामनेरचा ‘नटसम्राट’ संतोष सराफची मृत्यूशी झुंज संपली

0
25

रंगमंचावरून घेतलेली ‘एक्झिट’ सर्वांना ठरली चटका लावणारी

साईमत/जामनेर/प्रतिनिधी

कायम आयुष्यात पॉझिटिव्ह राहणारा… मनोरंजनाचा निखळ झरा…खळखळ हसविणारा ‘नटसम्राट’ संतोष सराफ रंगमंचावर अर्धा डाव सोडून गेला. त्याची चटका लावणारी ‘एक्झिट’ कायम जामनेरकरांच्या स्मरणात राहणार आहे. जवळपास त्यांनी दोन महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर नियतीने डाव साधला. मंगळवारी, १५ ऑक्टोबर रोजी त्यांचा ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल उपचार सुरु असतांनाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. ही बातमी जामनेरात धडकताच अनेकांचे ह्दय पिळवटून गेले. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अनेकांचे अश्रूही अनावर झाले होते. एका चांगल्या कलावंताला जामनेरकर मुकले असल्याची खदखद अनेकांनी व्यक्त केली.

शहरातील गजबजलेल्या वाकी रस्त्यावरील ‘माऊली किराणा’ जवळ गेल्या २० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला होता. त्यात सोनेश्वर मंदिराजवळील दर्शन पार्क, वाकी बु.येथील रहिवाशी तथा महाराष्ट्रभर स्वच्छ, सुंदर, आरोग्य मिशनबाबत जनजागृती करणारा पथनाट्य कलावंत जामनेरचा ‘नटसम्राट’ संतोष सराफ हे सिमेंट मिक्सर वाहनाच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्रथम जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवस खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावल्यामुळे संतोष सराफ यांना मुंबई येथील ब्रीज कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथेच त्यांनी मंगळवारी, १५ ऑक्टोबर रोजी जगाचा निरोप घेतला.

त्यांच्यावर जामनेर येथे बुधवारी, १६ रोजी दुपारी दीड वाजता ह्दयदावक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक लहान भाऊ, बहीण, पत्नी ज्या पंचायत समितीत कार्यरत आहेत आणि चार वर्षाची चिमुकली मुलगी असा परिवार आहे.

जामनेरात ‘संतोष’च्या नावाने कायमस्वरूपी
कलाकृतीची रसिकांनी दिली एकमुखी हाक

अंत्यसंस्कारावेळी विविध समाज, नाट्य उपक्रमातील सहभागी नागरिक, कलावंत, सोनार समाजाचे बांधव, जामनेरातील नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ, कनिष्ठ कलावंत, विविध राजकीय पक्षांचे राजकारणी मंडळी, लोकप्रतिनिधी यांची आवर्जून लक्षणीय मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मोठ्या स्तरावर सर्वांनी शब्दसुमनांनी त्याला आदरांजली वाहिली. भविष्यात ‘संतोष’ यांच्या नावाने जामनेर शहरात एखादी कायमस्वरूपी कलाकृती रसिकांसाठी लवकरच सुरू करण्याची एकमुखी हाक देण्यात आली. ती लवकरच पूर्ण होवो, हीच त्यांना खरी भावांजली ठरेल, अशी अपेक्षा सर्व रसिक प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here