साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रातून गौण खनिजाची अवैधरित्या होणारी चोरटी वाळू वाहतूक करणारे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसिलदारांना नुकतेच देण्यात आले. तलाठी मंडळ अधिकारी वाळू माफिया यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर चाळीसगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे, वडगाव लांबे, जामदा, शिवारातील, गिरणा नदी पात्रातील वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सुरू आहे. ह्या भागात वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर, टिपर, ट्रॅक्टर आदी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्या वाहनावर कोणत्याही प्रकारचे नंबर टाकलेला नाही. तसेच ही वाहतूक रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहन चालक हे त्यांचे वाहन हे भरधाव वेगाने चालवितात. त्यामुळे बरेच अपघात झालेली आहेत. त्यात बहुतांश निर्दोष लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अजूनही अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चाळीसगाव तालुक्यातील कोणाच्या मार्गदर्शनानुसार वाळू चोरी केली जाते याबाबतही चौकशी करावी. तसेच तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचे मोबाईलचे सीडीआर तपासले तर आपल्या तत्काळ लक्षात येईल की, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे सीडीआर शहर पोलीस स्टेशन यांच्यामार्फत तपासण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात नमूद केली आहे.
निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगावचे तालुकाध्यक्ष विलास चव्हाण, तालुका उपाध्यक्ष हंसराज पगारे, तालुका महासचिव कलीम सय्यद, संघटक बापू जाधव, बाबासाहेब धनेश्वर, दानेश मण्यार, मिलिंद भालेराव, शिवदास केदार, राकेश पगारे, संदीप केदार, अजय अहिरे, महिंद्र निकम, विनोद केदार, जयपाल पगारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.