चाळीसगावातील सकल मराठा समाजातर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील नारायण गडावर दसऱ्यानिमित्त महाराष्ट्रातील मराठा समाजाचा मेळावा दसऱ्याच्या निमित्ताने घेतला होता. त्या मेळाव्याच्या संदर्भात भाजपाचे व आरएसएसच्या सीमा मनोहर यांनी खालच्या स्तरावर जाऊन मराठा समाजाचे बांधव मेळाव्यात चेंगरून मेले पाहिजे होते, असे अवमानजनक वक्तव्य केल्याने सीमा मनोहर यांच्यावर गुन्हा दाखल करावा,
अशा आशयाची मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने चाळीसगाव तहसिलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंगळवारी, १५ रोजी केली आहे.संपूर्ण महाराष्ट्राची त्यांनी माफी न मागितल्यास महाराष्ट्रातील मराठा समाज रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची जागा दाखवेल.
महाराष्ट्रातील मराठा समाज न्यायासाठी लढतो आहे, असे असताना वारंवार मराठा समाजावर खालच्या स्तरावर बोलून समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, म्हणून चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील यांना चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनावर प्रा.चंद्रकांत ठाकरे, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, प्रा.तुषार निकम, अनिल कोल्हे, प्रदीप मराठे, मुकुंद पवार, भरत नवले, दीपक देशमुख, विनोद जाधव, विजय देशमुख, ललित पवार, संजय जोगी, अक्षय पवार, के.जी.सूर्यवंशी, कल्पेश घुले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.