साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
शहराचे माजी नगराध्यक्ष, समाजभूषण, सहकार महर्षी स्व.डी.एम.माळी यांचे नातू तसेच शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक हेमंत ज्ञानेश्वर माळी आणि ज्योती माळी यांचे चि.चेतन व नांदगाव तालुक्यातील साकोरे गावाचे रहिवासी सुनिता व दिलीप उत्तम सुरसे यांची कन्या स्नेहल यांचा सत्यशोधक विवाह महात्मा फुले हायस्कूलच्या प्रांगणात नुकताच उत्साहात पार पडला. विवाह सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, पर्यावरण, क्रीडा, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
खंडेरायाची तळी भरून सत्यशोधक विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यानंतर सार्वजनिक सत्यधर्माची प्रार्थना सामूहिक रितीने घेण्यात आली. सत्यशोधक विवाह स्थळी क्रांतीची मशाल वधू-वरांच्या हस्ते पेटविण्यात आली. यानंतर वर माता-पिता व वधू माता-पिता यांच्या हस्ते महात्मा बळीराजा, संत शिरोमणी सावता महाराज, कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
राष्ट्रपिता जोतिराव फुले लिखित मंगलाष्टक झाल्यानंतर वधू-वरांनी सामूहिक सार्वजनिक सत्यधर्म प्रतिज्ञेची शपथ घेतली. सत्यशोधक विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे आलेल्या प्रत्येक मान्यवराला सत्यशोधक समाज संघाने प्रकाशित केलेल्या सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टक सर्व पूजाविधीचे ३०० ग्रंथाचे वाटप करण्यात आले. यानंतर धरणगाव व एरंडोल तालुक्यातील सत्यशोधक विवाह लावणाऱ्या २० कुटुंबातील व्यक्तींचा सहपरिवार वैचारिक ग्रंथ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. यामध्ये धरणगाव शहरात पहिला सत्यशोधक विवाह २००३ला संजय छगन महाजन, दुसरा २०१६ ला आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा पुतण्या राहुल, तिसरा २०२२ ला लक्ष्मणराव प्रभाकर पाटील यांची भगिनी, चौथा २०२३ ला जगन्नाथ नथू पाटील यांचे चि. हेमंत आणि पाचवा २८ एप्रिल २०२४ ला हेमंत माळी यांचे चि.चेतन यांचा सत्यशोधक विवाह थाटामाटात पार पडला.
यावेळी उबाठा शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे (चाळीसगाव), शिवदास महाजन (एरंडोल) यांनी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्म पद्धतीने सर्व विधी करण्यात आले. यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा सूत्रसंचलन पी.डी.पाटील, लक्ष्मणराव पाटील तर आभार हेमंत माळी यांनी मानले.