साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
यावल तालुक्यातील आमोदे येथील श्रीराम मंदिरावरील मजल्यावर जेडीसीसी बँकेच्या शाखेत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जेडीसीसी बँक व मंदिराचा उत्तरेकडील अर्धा भाग जळून खाक झाला आहे. ही भीषण आग गुरुवारी, २ मे रोजी रात्री १०-३० च्या सुमारास लागून रात्री तीन वाजता आटोक्यात आणता आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बँकेतील टेबल, खुर्च्या व इतर फर्निचर, रजिष्टर, कागदपत्र सर्व जळून खाक झाले आहे. मंदिरावर असलेला झेंडा आणि गाभाऱ्यात विराजमान श्रीराम, लक्ष्मण, सीतामाईसह इतर देवता सुरक्षित असल्याचे पुजारी कन्हैया महाराज यांनी सांगितले.
मंदिर अत्यंत पुरातन, तीन मजली सागवानी लाकडाचा ढाचा असलेले मजबूत बांधकामाचे, छान रंगरांगोटी केलेले भव्यदिव्य जागृत मंदिराच्या उत्तरेकडील भागासह वरील दोन मजले पूर्णपणे जळून खाक झाले. मंदिराच्या दक्षिणेकडील तळमजल्याचा काही भाग सुरक्षित असला तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री आगीची माहिती जसजशी परिसरात पसरली तसतसे फैजपूर, सावदा, भुसावळ, यावल, रावेर येथील अग्निशमन बंबानी शर्थीचे प्रयत्न करून आग विझविली. फैजपूर, सावदा, हिंगोणा, न्हावी, बामणोद, पाडळसा, भालोद, भुसावळ येथील राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्ते आमोद्यात धावून आले.
लॉकरमधील रक्कम सुरक्षित
गावात झालेल्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणामुळे आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडचणी आल्या. मंदिरासमोरील रस्त्यावर एकाच दिशेने अग्निशमन बंब येऊन परत रिव्हर्स घ्यावे लागत होते. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास उशीर लागत होता. जेडीसीसी बँकेचे कामकाज ऑनलाईन असल्याने संपूर्ण डाटा सुरक्षित आहे. त्यामुळे खातेदारांनी काळजी करू नये. बँकेचे लॉकर तळमजल्यावर असल्याने लॉकरमध्ये असलेली रक्कम सुरक्षित असल्याचे बँकेचे शाखाधिकारी जावळे यांनी सांगितले. भीषण आगीमुळे आमोदेसह परिसरातील आजूबाजूची संपूर्ण गाव रात्रभर जागी होते. गावातील आबालवृद्ध भयभीत झाले होते.
घटनास्थळी अनेक जण दाखल
घटनास्थळी फैजपूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. निलेश वाघ आपल्या स्टॉपसह, बँकेचे चेअरमन संजय पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, फैजपूरचे पिंटू राणे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, उमेश पाटील, बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते. शुक्रवारी, ३ मे रोजी सकाळी जळगाव येथून जिल्हा बँकेतील मुख्य शाखेतून अधिकारी वर्ग येथे हजर झाला. तात्काळ आमोदा शाखेचा व्यवहार आमोदा येथील दूध डेअरीच्या इमारतीत चेअरमन राजेंद्र चौधरी व संचालक मंडळाच्या सहकार्याने सुरळीत करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, व्यवस्थापक सुनील पवार, व्यवस्थापक मंगलसिंग सोनवणे, विभागीय व्यवस्थापक हिरामण महाजन, यावल भुसावळचे विभागीय उपव्यवस्थापक राजेंद्र झांबरे, सुधीर भंगाळे, प्रांजल चौधरी उपस्थित होते.