शिवपुराण कथा, कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेत भाविकांनी समाधान व्यक्त केले.
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
गणेश जयंतीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. शहरातील विविध भागांतील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली असून पूजन, अभिषेक, कीर्तन, गणेश आवर्तन व महाप्रसादाच्या आयोजनामुळे संपूर्ण परिसर श्रद्धा व भक्तिभावाने भारावून गेला होता.
बजरंग बोगद्याजवळील कृषी कॉलनी परिसरातील नवसाच्या गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या मंदिराचा आज २८ वा वर्धापन दिन असल्याने भाविकांचा उत्साह दुणावलेला दिसून आला. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अनेक भाविकांनी आपल्या नवसपूर्तीच्या भावना व्यक्त करत गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली. यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. मंदिराचे पुजारी चेतन कपोले गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजन, अभिषेक व आरती पार पडली. भाविक महेश पाटील यांनी मंदिरामार्फत राबविण्यात येणाऱ्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
विसनजी नगर येथील श्री इतर बुद्धी गणेश मंदिर व महादेव मंदिरातही गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. सकाळी यज्ञ व अभिषेकानंतर गणेश आवर्तन घेण्यात आले. या कार्यक्रमांसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मंदिर पुजारी प्रमोद जोशी यांनी गणेश जयंतीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विशद करत भाविकांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, जुने जळगाव परिसरात जय हनुमान सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे यावर्षी शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर भरीतपुरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे जुने जळगाव मित्र मंडळ व जय हनुमान सांस्कृतिक मित्र मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने उत्तम नियोजन करण्यात आले होते.
मंडळाचे कार्यकर्ते सेवाभावी वृत्तीने कार्य करताना दिसून आले.भाऊ, हरीश कोल्हे तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच उत्साहाचे वातावरण लाभले. शिवपुराण कथा, कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेत भाविकांनी समाधान व्यक्त केले. एकूणच गणेश जयंतीनिमित्त जळगाव शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
