उपचारासाठी निघालेल्या दुचाकीवर मृत्यूची धडक
साईमत/चोपडा /प्रतिनिधी :
“वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी निघालो आणि स्वतःच काळाच्या तावडीत सापडलो…” अशी हृदय पिळवटून टाकणारी घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडली. घार्डी फाटा परिसरात शुक्रवारी भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत आजारी वडिलांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान वडिलांनीही अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी अपघातामुळे लासुर गावावर शोककळा पसरली आहे.
चोपडा तालुक्यातील लासुर येथील रहिवासी मोहम्मद लुकमान ठोके (वय ४२) हे आपले वृद्ध वडील लुकमान मुसेखा ठोके (वय ७४) यांना उपचारासाठी दुचाकीने जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात घेऊन जात होते. घार्डी फाटा परिसरातून जात असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात मोहम्मद लुकमान ठोके यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीस धाव घेत जखमी वृद्धाला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच नियतीने पुन्हा घाला घातला आणि वडिलांचीही प्राणज्योत मालवली. एका मुलाने वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी सुरू केलेला प्रवास, बाप-लेक दोघांच्याही मृत्यूने संपुष्टात आला.
एकाच दिवशी घरातील दोन कर्त्या पुरुषांचे निधन झाल्याने ठोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज चिरणारा होता. नगरसेवक इबा पटेल यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.
या भीषण अपघातामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवजड वाहनांचा वेग, निष्काळजी वाहनचालक आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्था यामुळे असे अपघात सातत्याने घडत असल्याची भावना स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे. “आजारी वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी निघालेल्या मुलाचाच वाटेत मृत्यू व्हावा, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते?” अशी हळहळ गावकऱ्यांनी व्यक्त केली. संबंधित ट्रॅक्टर चालकावर कठोर कारवाई करावी, तसेच या मार्गावर वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
