नियतीचा क्रूर घाला! अक्कलकोट दर्शनाला निघालेल्या ५ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू
साईमत /सोलापूर /प्रतिनिधी : –
अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या पनवेल येथील सहा मित्रांवर शनिवारी रात्री ११.३० वाजता काळाने क्रूर घाला घातला. पुणे-सोलापूर महामार्गावरील मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ अर्टिगा कार झाडावर आदळून कोसळली, ज्यामुळे तीन पुरुष आणि दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील सहा मित्र अक्कलकोटच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. रात्रीच्या वेळी महामार्गावर प्रवास करताना कारवरून चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडाला जोरात आदळले. धडक इतकी भयंकर होती की कार रस्त्यापासून १० ते १५ फूट दूर झुडपांमध्ये फेकली गेली.
अपघातात तीन पुरुष आणि दोन महिला जागीच ठार झाले, तर ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर ७, पनवेल) या महिला गंभीर जखमी झाल्या. तिला तत्काळ मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. मृतदेह कारमध्ये अडकलेले होते आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहन कापून बाहेर काढले.
परिसरातील नागरिकांनी अपघाताचा आवाज ऐकून धाव घेतली आणि मोहोळ पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. अपघातग्रस्त कार चक्काचूर झाली असून या घटनेमुळे पनवेल परिसरात आणि महामार्गावर शोककळा पसरली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी या अपघाताचे मुख्य कारण अत्यधिक वेग असल्याचे म्हटले आहे. मोहोळ पोलिस ठाण्यात या घटनेबाबत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून, स्थानिक प्रशासनाने मृतकांच्या कुटुंबीयांना तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे.
