साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
कोणतीही पूर्वसूचना न देता आपत्कालीनच्या नावाने वीज बंद करण्याच्या घटना घडत असल्याने तापी परिसरातील मठगव्हाण, नालखेडा, रुंधाटी, मुंगसे, गंगापुरी, पातोंडा येथील संतप्त शेतकऱ्यांनी पातोंडा येथील महावितरणच्या उपकेंद्रात धडक देऊन घेराव घालून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.
गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने पावसाचा अजूनही पत्ता नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत. मशागतीसाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून टाकले. जून महिन्यात लागवड केलेली बागायती कापसाची पिके आता कमरेइतके वाढलेली आहेत. काही दिवसांनी कापूस वेचणीला लागतील, अशी पिकांची स्थिती आहे. पण पावसाचे पाणी महिनाभरापासून न पडल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात जिराईत पिकांची स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात जिराईत पिकांची स्थितीही चिंताजनक जाणवू लागली आहे. त्यांना पाणी देणे अत्यावश्यक असून शेतकऱ्यांना रात्र पाळीपासून पिकांना पाणी भरण्यासाठी महावितरणच्या वेळापत्रकानुसार जावे लागत आहेत. शेतात गेल्यावर शेतीपंपाची मोटर सुरू केल्यावर काही वेळातच वीज बंद केली जात आहे.
पाण्याअभावी उभी पिके जळून खाक होतील
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री शेतकऱ्यांकडून विचारणा केल्यावर वरिष्ठ पातळीवरून लोडशेडिंगसाठी आपत्कालीन संदेश येत आहे. त्यानुसार शेतीपंपाची वीज बंद केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, पाणी भरण्यासाठी मोटर सुरू केल्यावर एक दीड तास होत नाही तोवर वीज बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतातून घरी व घरातून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शासन शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवू शकत नाही. किमान रात्री तरी किमान आठ तास वीज पुरवठा सुरळीत का ठेवू शकत नाही? असा प्रश्न आता विचारला जात आहे. पिकांना आता जर पाणी दिले नाहीत तर उभी पिके जळून खाक होतील व शेतकऱ्यांना तोंड ठोकल्याशिवाय पर्याय उरणार नाही. आधीच शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज उचलून मोठे आर्थिक संकट उचलले आहे. त्यातच जर पिके वाया गेली तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता शेतीपंपाची लोडशेडिंग सुरू करून दिली आहे.
शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले
संतप्त शेतकऱ्यांनी सर्व प्रकारांमुळे पातोंडा महावितरणचे उपकेंद्र गाठत कार्यालयाला घेराव घातला. पण तिथल्या कर्मचाऱ्यांनी आम्ही फक्त वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करीत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केल्यावर विजेचे उत्पादन कमी व मागणी जास्त असल्याने सर्वत्र लोडशेडिंग केली जात असल्याचे तेच ते उत्तर शेतकऱ्यांना मिळाले. त्यात शेतकऱ्यांनी जर यावर तुम्ही तात्काळ तोडगा काढला नाही तर आमचे पिके तुमच्या लोडशेडिंगच्या पाण्याअभावी मरतील, असे शेतकऱ्यांनी सुनावले. अशा आशयाचे निवेदन शेतकऱ्यांनी प्रभारी कनिष्ठ अभियंता सुरेश धनगर, कर्मचारी सुरेश नेरकर यांना देण्यात आले. निवेदनावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महावितरणचे कार्यालय बंद पाडण्याचा इशारा
पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत. रात्री-बेरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जातो. तेवढ्यात बत्ती गुल होते. रात्री खाली हात घरी माघारी जावे लागते. परिणामी पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके हातातून जाण्याची शक्यता आहे. महावितरणने लोडशेडिंगच्या नावाखाली फक्त शेतकऱ्यांवर जो अन्याय सुरू केला आहे, तो तात्काळ बंद केला नाही तर महावितरणचे कार्यालय बंद पाडू, असा इशारा शेतकरी केदार पवार यांनी दिला आहे.



