साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे तीन हजार ऊस उत्पादकांची १५० रुपये टनप्रमाणे थकीत असलेली उसाची रक्कम आता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ३ कोटी ३० लाख रुपयांची ही रक्कम गुरुवारी चोसाकाच्या बुलढाणा अर्बन बँकेच्या खात्यात जमा झाली आहे. ऐन दसरा, दिवाळीच्या काळातच हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांची ‘दिवाळी’ गोड होणार आहे. चोसाकाकडून देणे बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकेला पाठविण्यात आली आहे. सोमवारपासून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळावेत, यासाठी राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी बारामती ॲग्रोचे अध्यक्ष आ. रोहित पवार, उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधत पाठपुरावा केला होता. यासाठी माजी आ. कैलास पाटील, ॲड. संदीप पाटील, घनशाम अग्रवाल, चोसाकाचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष एस. बी. पाटील आणि संचालक मंडळाचे सहकार्य लाभले.
बारामती ॲग्रोला आमचे नेहमीच सहकार्य असणार आहे. चोसाकाचे सर्व २१ जणांचे संचालक मंडळ एकसंघ असल्याने ठराव करून दिला. अरुणभाई गुजराथी आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रयत्नाने ही रक्कम मिळत आहे. सोमवारपासून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी करू नये. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी ऊसाची लागवड करावी, जेणेकरून क्रशिंग चांगले होईल. तसेच कर्मचारी वर्गाचा प्रश्नही श्रेष्ठींपुढे मांडला आहे. त्यावरही लवकरच तोडगा निघेल.
– चंद्रहासभाई गुजराथी
चेअरमन, चोपड़ा शेतकरी सहकारी साखर कारखाना, चोपडा