साईमत, जळगाव ः विशेष प्रतिनिधी
जळगावच्या राजकीय क्षितीजावर अनेक वर्षे ज्यांनी अधिराज्य गाजवले, राजकीय पक्षाच्या वलयापेक्षा ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर करारी, धडाडी, भरारी अशी भूषणे मिळवत समाजात दबदबा निर्माण केला. त्या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या गेल्या आठवड्याभरातील डळमळीत राजकीय भूमिकेबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांनी राजकारणातून पूर्णपणे निवृत्तीची भूमिका घेतली असतांना दोन दिवसातच असा काय साक्षात्कार झाला की, त्यांनी प्रचाराच्या तोफा थंडावत असतांनाच जळगाव जिल्ह्यातील दोन्ही भाजपा उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका अचानक जाहीर करुन पुन्हा राजकारणात प्रवेश केला. याबाबत त्यांच्या हजारो चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सुरेशदादा जैन हे १९८० पासून जळगावच्या राजकारणात सक्रीय झाले. प्रारंभीच्या टप्प्यात त्यांनी जळगावचे नगराध्यक्षपद भूषविले व त्या काळात त्यांनी जळगाव शहराच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देत वाटचाल सुरु केली. यादरम्यान त्यांनी जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली व ते प्रचंड मतांनी विजयी झाले. तब्बल ९ वेळा ते आमदार झाले. विशेष म्हणजे या दरम्यान त्यांनी वारंवार पक्षांतरे केली. मात्र, जळगावकरांनी त्यांना निवडून दिले. त्यानंतर त्यांची खासदार होण्याची तीव्र इच्छा होती व त्यांनी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जळगाव लोकसभा लढवली पण त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्या राजकीय वाटचालीत राष्ट्रवादी(एस), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना असा प्रवास केला. यादरम्यान त्यांनी दोन वेळा मंत्रीपदेही भूषवली पण मुख्यमंत्र्यांसमोरही त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली व तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ‘आपण जनतेचे सेवक आहात’ अशी जाणीव करुन दिली होती. मध्यंतरी त्यांना घरकूल घोटाळाप्रकरणी अनेक वर्ष तुरुंगात जावे लागले. त्यादरम्यान ही त्यांनी जेलमधून विधानसभा लढवली पण त्यांच्या पदरी अपयश पडले. तेव्हापासून त्यांनी राजकारणापासून चार हात दूर राहणे पसंत केले. मध्यंतरी त्यांचा जामीन झाला. त्यांनी राजकारणातून निवृत्त राहण्याची भूमिका घेतली. त्यांच्या निवासस्थानी भेटीला जाणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना किंवा प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेतून आर्शिवाद दिले. जळगावकरांनीही सुरेशदादा आता वयोमानानुसार व तब्येतीमुळे राजकारणातून निवृत्त झाल्याचे गृहीत धरले.
असे वाटत असतानाच लोकसभा निवडणुका घोषित झाल्या. सुरेशदादा जैन हे जळगावचे एक प्रस्थ असल्यामुळे निवडणुकीतील सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी व प्रमुख नेत्यांनी त्यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व त्यावेळी सुरेशदादांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. इथपर्यंत सारे ठीकठाक होते. त्यांची भूमिका त्यांच्या चाहत्यांनाही पटणारी होती. पण गेल्या आठवड्यात ज्या घडामोडी झाल्या त्या पाहून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना व चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. चार-पाच दिवसांपूर्वी सुरेशदादा जैन यांनी अधिकृतपणे राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली व त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल जी उलटसुलट चर्चा सुरु होती. त्यास पूर्णविराम दिला असे वाटले. त्यादृष्टीने त्यांनी ९ मे रोजी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजिनामा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविला. त्यामुळे सुरेशदादा खरोखरच राजकारणातून निवृत्त झाल्याचे वाटले. पण लगेच एक दिवसात पुन्हा कुठून व कशी राजकीय चक्रे फिरली व त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरु झाली आणि त्यांना आपल्याच राजकीय निवृत्तीच्या निर्णयावर ठाम राहता आले नाही. मुंबईवरुन परतल्यावर जळगाव रेल्वे स्थानकावर त्यांना काही पत्रकारांनी गाठले व तुमचा कोणाला पाठिंबा आहे असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी घाईघाईने जातांना, माझा सर्वांना पाठिंबा असल्याचे घोषित केले. हे वृत्त प्रसारमाध्यमातून जळगावकर बघत असतानाच, सुरेशदादांच्या शिवाजीनगर निवासस्थानी वेगळेच राजकीय नाट्य रंगले होते.
मंत्री गिरीश महाजन, आ.राजूमामा भोळे, माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील व महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ हे निवासस्थानी दाखल झाले अन् काय डील झाली कुणास ठाऊक, दादांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा करुन टाकली. हे वृत्त वाऱ्यासारखे शहरासह जिल्ह्यात पसरले व एकेकाळी करारी, धडाडी व भरारी म्हणून ओळखले जाणारे दमदार नेते सुरेशदादा जैन यांची भूमिका एकाच आठवड्यात एवढी डळमळीत कशी झाली, असा प्रश्न त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून विचारला जात आहे.