अलिबाग ः
दुसरे लग्न केले म्हणून मानसिक त्रास देणाऱ्या बायकोला निर्जन स्थळी नेऊन तिचा खून केल्याची घटना सुधागड पाली तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी नवऱ्याला जेरबंद केले आहे.सागर किसन पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
९ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उंबरवाडी येथे जंगलभागात अनोळखी महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता.या घटनेनंतर पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक तपासात सदर महिलेचा खून करून तिचा मृतदेह पाच ते सहा दिवसापूर्वी जंगलात टाकला असल्याचे दिसून आले.
ही बाब लक्षात घेऊन पोलीसांनी गेल्या दिवसात बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती घेतली. त्यात आरड्याची वाडी येथून कुसबा सागर पवार ही २४ वर्षी महिला बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर पतीला ओळख पटविण्यासाठी बोलवून घेतले. मात्र त्याने मृत महिला ही आपली बायको नसल्याचे सांगीतले. पोलीसांनी बेपत्ता महिलेच्या घरी जाऊन सहा वर्षाच्या मुलाला विश्वासात घेतले. आणि नंतर मृत महिलेचे कपडे दाखवून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.तेव्हा हे कपडे आपल्या आईचेच असल्याचे मुलाने सांगितले.त्यामुळे पोलीसांचा सागर पवार यांच्यावरील संशय बळावला.सागर जाणिवपूर्वक महिलेची ओखळ पटवत नसल्याचा आणि काही तरी लपवत असल्याची जाणीव त्यांना झाली.
त्यामुळे पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबूली दिली. दुसरे लग्न केले म्हणून पत्नी कुसबा ही मानसिक त्रास देत होती. याच रागातून तिचा काटा काढल्याचे त्याने सांगितले. ५ सप्टेंबर २३ रोजी दुपारी एक ते तीन दरम्यान कुसबाला मोटरसायकलवर फिरायला घेऊन गेला.नंतर उंबरवाडी डोंगरावरील भुत्याशी मळशी या ठिकाणी जंंगलात नेऊन तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह तिथेच टाकून घरी परत आला. त्यानंतर बायको बेपत्ता असल्याची तक्रार दिली पण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपीला जेरबंद केले.या प्रकरणी पोलीस ठाण्यात सागर किसन पवार याचे विरोधात भा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून पोलीसांनी त्याला अटक केली आहे.
