Fake seeds : १८ लाखांचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

0
14

१८ लाखांचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

चोपडा (प्रतिनिधी) –

तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभागाने प्रतिबंधित असलेले १८ लाख रुपये किमतीचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त केले आहे. एका संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, विद्या इंगळे, प्रकाश मथुरे, समा तडवी यांच्या पथकाने चुंचाळे येथील संशयित आरोपी नितीन नंदलाल चौधरी यांच्या चुंचाळे-अक्कुलखेडा रोडवरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.

या कारवाईत प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्याचे १२७३ पाकिटे, ज्याची किंमत १७ लाख ८२ हजार २०० रुपये आहे, असा साठा जप्त करण्यात आला. संशयित आरोपी नितीन चौधरी याच्यावर बियाणे कायदा, बियाणे नियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी फिर्याद दाखल केली तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here