साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
सामान्यांना कमी वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रशासनात पारदर्शकपणा व गतिमानता आणण्यासाठी सोयगाव प्रशासकीय इमारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सोयगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय,सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसिलदार रमेश जसवंत यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे, नगरपंचायत अध्यक्षा आशाबी तडवी, शहर प्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे, गटनेते अक्षय काळे, राजू दुतोंडे, कदीर शहा, सर्व सन्माननीय नगरसेवक, पपींद्रपालसिंग वायटी, दिलीप देसाई, पत्रकार मित्र व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले की अद्यावत प्रशासकीय इमारतींमुळे नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. तसेच कमी वेळेमध्ये शासकीय सुविधा , विविध योजनेच्या लाभासाठी आवश्यक प्रमाणपत्र एकाच छताखाली मिळणार असल्याने नागरिकांना लाभ मिळणार आहे. सोयगाव तालुक्यामध्ये अजिंठा हे जागतिक पर्यटन स्थळ असल्याने युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला ह्या इमारतीचा उपयोग होणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार प्रशासनात देखील बदल करण्यात येत आहे हे गतिमान सरकार असून शासनाने विविध जनहिताचे निर्णय घेतलेले आहेत असेही ते म्हणाले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की सोयगाव तहसील कार्यालयामुळे शासकीय कामे एकाच ठिकाणी झाल्याने ग्रामीण भागातील जनतेची सोय होणार आहे. सोयगावला रेल्वेने जोडण्यासाठी जळगाव ते जालना हे रेल्वेलाइनचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल. त्याचप्रमाणे पाचोरा ते जामनेर या रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. वंदे भारत रेल्वेचे 400 पैकी 120 रेल्वेबोगी लातूर येथील कारखान्यात तयार करण्यात येणार असल्याचेही दानवे पाटील यांनी सांगितले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणले की सोयगाव तालुक्याच्या विकासासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्रशासकीय इमारतीमुळे या भागाचा विकास होणार आहे. नागरिकांना आता सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत असेही ते म्हणाले.