साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील हॉटेल राजवाडामध्ये रविवारी, १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून २५ मिनीटांनी भुसावळ तालुका पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. कारवाईत हॉटेलचे मालक व व्यवस्थापकांकडून परप्रांतीय तीन तरूणींची सुटका करुन त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, देहविक्री करणाऱ्या तिन्ही परप्रांतीय तरुणींची सुटका करुन त्यांना महिला सुधारगृहात हलविण्यात आले आहे.
सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील राजवाडा हॉटेल व लॉजिंगवर तालुका पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत हॉटेल मॅनेजर पंडीत टोंगळे (रा. कुऱ्हे पानाचे) व मालक संभाजी एकनाथ पाटील (रा. जामनेर) हे स्वतःच्या फायद्याकरीता पीडित महिलांना हॉटेलमध्ये बोलवून पैशांचे प्रलोभन देऊन देह व्यापार करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे निष्पन्न झाले. महिला पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मॅनेजर पंडित टोंगळे (वय ५६), मालक संभाजी एकनाथ पाटील (वय ४५) आणि सुरेश बारकू सोनवणे या तीन जणांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सतिष कुलकर्णी, वाहतूक शाखेच्या सहाय्यक फौजदार रुपाली चव्हाण, हवालदार प्रदीप पाटील, अनिल झुंझारराव यांनी केली. तपास पोलीस उपअधीक्षक सतिष कुळकर्णी करीत आहे.