विद्यार्थ्यांसह खान्देशातील डॉक्टरांनी घेतला लाभ
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशन आणि जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय “पाठीचा कणा आणि शवचिकित्सा”विषयी शनिवारी, १३ डिसेंबर रोजी कार्यशाळा आयोजित केली होती. त्याचे सकाळी अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विचारमंचावर मुंबई येथील डॉ. रघु प्रसाद वर्मा, डॉ. अभय नेने, ऑर्थोपेडिक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, डॉ. मिलिंद कोल्हे, महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उदघाटन केले. प्रास्ताविकातून डॉ. सूर्यवंशी यांनी कार्यशाळा घेण्यामागील उद्देश स्पष्ट करून, भविष्यात कौशल्यपूर्ण असे ऑर्थोपेडिक सर्जन विद्यार्थ्यांमध्ये तयार होऊन या महाविद्यालयातून बाहेर पडतील, हे ध्येय असल्याचे सांगितले. कार्यशाळेच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यानंतर अधिष्ठाता डॉ. ठाकूर म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात स्पर्धा खूप आहे. मात्र, आपल्या वर्तणूक व कौशल्याने आपण चांगला डॉक्टर समाजात होऊ शकतो. या क्षेत्रात चांगले करियर आहे. टीमवर्क महत्वाचे असून, जळगावातून महानगरात रुग्ण उपचारासाठी जाण्याऐवजी आता जळगावातच महानगरांसाठी सुविधा कार्यशाळेमुळे भविष्यात निर्माण होतील, असेही ते म्हणाले.
दिवसभरात डॉक्टर्स, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
दिवसभर कार्यशाळेत मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनीही विविध विषयांवर विद्यार्थी व डॉक्टरांना मार्गदर्शन केले. खान्देशातील डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते. पाठदुखीचे निदान आणि उपचारांसाठीची कार्यप्रणाली तसेच पाठदुखीचे आजार आणि पायात वेदना याविषयी डॉ. रघु प्रसाद वर्मा यांनी सविस्तर माहिती दिली. ऑस्टियोपोरोसिसचे निदान आणि व्यवस्थापनासाठीची कार्यप्रणाली याविषयी डॉ. शीतल मोहिते यांनी हाडाचा ठिसूळपणाविषयी मार्गदर्शन केले. ऱ्हासजन्य कमरेच्या मणक्यासाठी पुनर्वसन याबाबत डॉ. अभय नेने यांनी, विशिष्ट वयात कमरेचे मणके झिजल्यावर रुग्ण उपचाराला येतात. मात्र, त्यांच्यावर योग्य उपचार केले तर ते पुन्हा क्रियाशील होऊ शकतात, असे सांगितले. शवविषयी शस्त्रक्रिया व तंत्र याबाबत डॉ. हर्षल बंब यांनी माहिती दिली. त्यानंतर गटचर्चा होऊन त्याबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शन केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी कार्यशाळेचे आयोजन सचिव तथा सहयोगी प्रा. डॉ. राजेंद्र अग्रवाल, सहा. प्रा. डॉ. पंकज घोगरे, डॉ. सुमित पाटील, वरिष्ठ निवासी डॉ. नितीन प्रजापत, डॉ. विशाल टापरे, डॉ. वीरेंद्र पाटील, डॉ. यश बोन्डे, कनिष्ठ निवासी डॉ. हनुमंत काळे, डॉ. तौसिफ अहमद, डॉ. साईनाथ जगताप, डॉ. अमोल कुऱ्हे, फिजिओथेरपिस्ट डॉ. कौस्तुभ ऑगस्टीन, डॉ. दिव्या राजपूत आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. अनुष्का निकम, डॉ. अनुष्का सोनार तर आभार डॉ. सारंग पटेकर यांनी मानले.
