जळगावात १४० लिटर गावठी दारू जप्त, दोघांवर गुन्हा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरात धडक कारवाई करत अवैध दारूविक्रीवर मोठा आळा घातला आहे. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार असल्याने निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रेल्वे स्थानक व शिवाजीनगर परिसरातून तब्बल १४० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण सीताराम सोनवणे आणि विवेक विजय ढाके अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे रेल्वे स्थानक परिसर आणि शिवाजीनगर भागात गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले.
निरीक्षक डी. एम. चकोर, एस. एम. मोरे, दुय्यम निरीक्षक जी. डी. अहिरे यांच्यासह ए. डी. पाटील, पी. पी. तायडे, आर. डी. जंजाळे आणि धनसिंग पावरा यांच्या पथकाने रेल्वे स्थानकाजवळ तसेच शिवाजीनगर परिसरात छापे टाकले. छाप्यादरम्यान किरण सोनवणे व विवेक ढाके हे गावठी दारूची विक्री करताना रंगेहात आढळून आले. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.
निवडणूक काळात अवैध दारूविक्री, पैशांचा वापर व इतर गैरप्रकार रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कारवाया तीव्र केल्या असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनीही अवैध दारूविक्रीची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
