तब्बल १९ वर्षांनंतरच्या भेटीने सर्व जण रमले आठवणीत…!
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील मेहरूणमधील वाय.डी.पाटील अर्थात यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयातील २००५- ०६ या वर्षातील दहावीच्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा नुकताच एक भव्य शालेय “गेट-टूगेदरचा” कार्यक्रम उत्साहात पार पडला. तब्बल १९ वर्षांनी झालेल्या भेटीने सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक आठवणीत रमून गेले होते. विद्यार्थ्यांनी १९ वर्षानंतर पुन्हा एक दिवसाच्या शाळेचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाला २००५- ०६ या वर्षातील तुकडी ‘अ’ चे सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. खंबायत तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. तसेच शालेय प्रार्थना घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकांना सत्कारावेळी भगवद्गीता भेट म्हणून दिली. विद्यार्थ्यांतर्फे शाळेला मानवंदना म्हणून म्युझिक साऊंड सिस्टीम भेट म्हणून देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची सध्याची प्रगती पाहून अभिमान व्यक्त केला. यावेळी श्रीमती पगार, अत्तरदे, श्री. देवरे यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
माजी विद्यार्थ्यांमध्ये पसरले आनंदी
अन् उत्साही वातावरण
शाळेची घंटा वाजली, नाईक सरांनी विद्यार्थ्यांना रांगेत उभे केले. राष्ट्रगीत, प्रार्थना, मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजक खेळ आणि विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सर्व गोष्टींनी शाळेतील माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण पसरले होते. यावेळी माजी विद्यार्थी जयमाला भूषण लाडवंजारी, प्रदीप येवले, सागर कोल्हे, सचिन गायकवाड, सविता पाटील, विशाल आंधळे यांनी मनोगत व्यक्त करून भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी रितेश सोनवणे, शितल वाघ, विशाल आंधळे, जयमाला लाडवंजारी, संदिप सावंत, दीपाली चौधरी, संपदा जावळे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक रुपाली पाटील, सूत्रसंचालन अनघा डोहोळे, शितल वाघ तर आभार विशाल आंधळे यांनी मानले.