साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील ६० माजी सैनिकांचा आणि एका विरपत्नीचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राज्य शासनाच्या महसूल सप्ताहानिमित्त येथील तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विविध विभागाशी निगडित माजी सैनिकांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. त्यात १० माजी सैनिकांनी यावेळी विविध विभागाशी निगडित तक्रारी दाखल केल्या. त्या तक्रारींवर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिले आहेत. तसेच महसूल सप्ताहानिमित्त तालुक्यातील विविध मंडळ अधिकारी कार्यालयात फेरफार अदालतीचे आयोजन केले होते. त्यात आत्महत्याग्रस्त वारसांच्या नोंदी घेण्यात आल्या. यासह नवीन नोंदी स्वीकारून पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध असल्याचे जामनेरचे नवनिर्वाचित मंडळ अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.