भाजपच्या २०२४ च्या महाविजयात प्रत्येक कार्यकर्त्याचा खारीचा वाटा असेल : विजय चौधरी

0
9

साईमत जळगाव प्रतिनिधी

गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपचे विचार तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी. समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचा भाजपच्या २०२४ च्या महाविजयात खारीचा वाटा असेल, असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजय चौधरी यांनी केले.

शहरातील ब्राम्हण सभा येथे सोमवार दि. २९ रोजी भाजपा पूर्व व पश्चिम जिल्हा तसेच जळगाव महानगर यांच्यातर्फे गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी उपस्थित जळगाव जिल्ह्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना श्री. चौधरी बोलत होते.

यावेळी खासदार उन्मेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आ. राजूमामा भोळे, भाजपच्या प्रदेश सचिव शालिनीताई बुंदे, जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई बेंडाळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख नंदकुमार महाजन, समन्वयक अजय भोळे, गोविंद अग्रवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे तसेच अमोल जावळे आणि डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील भाजपच्या नमो चषक, नमो ॲप, सरल ॲप, दिवार लेखन, संघटनात्मक बांधणी, वस्ती व पाडा संपर्क अभियान, नवीन पक्ष प्रवेश, बूथ रचना आदी विषयांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. डॉ.चौधरी यांनी गाव चलो अभियानाची पीपीटी सादर केली. आ. भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्री गिरीश महाजन यांच्या अभिनंदनाचा ठराव
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन तसेच मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनात यशस्वी मध्यस्थी केल्याचे श्रेय राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना देऊन दोघांच्या अभिनंदनाचा ठराव भाजपच्या जळगाव येथील कार्यशाळेत प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी मांडला. त्यास उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here