महायुती सरकार हद्दपार करा : खा.अमोल कोल्हे
साईमत।पाचोरा।प्रतिनिधी।
शहराच्या भडगाव रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकात शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जळगावात जिल्ह्यात पाच मतदार संघांत जनतेशी संवाद साधण्यासाठी शिवसंवाद यात्रेचे नियोजन केले आहे. शनिवारी, २१ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव, पारोळा, जामनेर येथे यात्रा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही यात्रा चाळीसगावचा कार्यक्रम आटोपून पाचोरामार्गे जामनेर जाणार असल्याने माजी आमदार दिलीप वाघ यांनी यात्रेत सहभागी प्रदेशाध्यक्ष, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह पक्षांचे महत्वाचे पदाधिकारी यांचे स्वागत करण्यासाठी भडगाव रस्त्यावरील मुख्य चौकात थोड्या वेळासाठी जिल्हाध्यक्ष यांना विनंती करून पाचोरा तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा पक्षातर्फे स्वागत कार्यक्रम आयोजित केला होता.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार कोल्हे यांचे पाचोरा शहरात साडे तीन – चार दरम्यान आगमन झाले असता फटाक्यांच्या आतषबाजी करून नेत्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. अमोल कोल्हे यांनी शिव संवाद यात्रेबाबत माहिती दिली. ही यात्रा महाराष्ट्राचा स्वाभिमान, मूल्य, तत्व आणि निष्ठा जपण्यासाठी आणि भाजपाच्या मांडीवर जाऊन बसलेल्यांना जागा दाखवायची आहे. महाराष्ट्राने तोडफोडीच्या राजकारणाला नाकारले हे लोकसभेच्या निकालात दिसून आले आहे.
जनतेने फसून जाऊ नये
राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण ओळखून राज्य सरकार नवीन योजना राबवत आहे. जनतेच्या खिशातून ३५ हजार करातून काढायचे आणि दीड हजार रुपये वाटायचे. जनतेने फसू नये. शेतकऱ्यांना रडविणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करण्यासाठी आणि ८४ वर्षांच्या योध्याने सुरु केलेल्या परिवर्तनाच्या लढ्यात सामील होवून शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले.
पक्षाला बळकटी देण्याचेच कार्य दिलीप वाघ यांनी केले
पक्षाला मागील काळात पक्ष फूटीला सामोरे जावे लागले. ८० टक्के आमदार पक्ष सोडून गेले. पण जनता पवार साहेबांच्या सोबत आहे. राजकीय जीवनात यश, अपयश येते. अपयशाने खचू नये. असाच लढा गेले काही वर्ष दिलीप वाघ लढत आहे. मात्र, त्यांनी पक्षाला बळकटी देण्याचेच कार्य केले. मतदार संघात त्यांची काय ताकत आहे, हे पक्ष श्रेष्ठी पवार साहेबांना सांगणार आहे. दिलीप वाघ यांच्या मागे रहा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ.सतीश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, विविध सेलचे राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, निरीक्षक श्री. काळे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, पक्ष नेते संजय वाघ, भूषण वाघ यांच्यासह पाचोरा-भडगाव तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन, आभार तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी मानले.